दुष्काळग्रस्त भागांसाठी ६,७२८ कोटींचा रोजगार निधी; छत्रपती संभाजीनगर विभागाला १,९४४ कोटी
मुंबई दि ३० :- दुष्काळी परिस्थितीमुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूर आणि इतर मजूर वर्गाला गावाच्या परिसरातच रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने मोठी आर्थिक तरतूद केली आहे. रोजगार हमी योजना विभागाकडून विविध विकासकामांसाठी तब्बल ६ हजार ७२८ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांनी ही माहिती दिली.
या निधीतून ग्रामीण भागात ३७५ प्रकारची वैयक्तिक तसेच सार्वजनिक स्वरूपाची कामे राबविण्यात येणार आहेत. रोजगारनिर्मितीसोबतच जलसंधारण, शेतीला पूरक सुविधा आणि गावातील मूलभूत पायाभूत सुविधांचा विकास करण्यावर भर दिला जाणार आहे.
शेतकऱ्यांना कोणती कामे करता येणार?
वैयक्तिक लाभाच्या योजनांमध्ये सिंचन सुविधा, गायगोठे, फळबाग लागवड, बोअरवेल पुनर्भरण, बांबू लागवड, प्रधानमंत्री आवास योजना, रेशीम उद्योगासाठी शेड आणि कंपोस्ट खड्डे यांसारख्या कामांचा समावेश करण्यात आला आहे.
तर सार्वजनिक स्वरूपाच्या कामांमध्ये तलाव दुरुस्ती, गॅबियन बंधारे, पाझर तलाव, माती बंधारे, शेत-पाणंद रस्ते आणि विविध जलसंधारणाची कामे हाती घेतली जाणार आहेत.
या माध्यमातून ग्रामीण भागातील नागरिकांना तातडीने रोजगार मिळण्याबरोबरच गावांमध्ये भविष्यातही उपयोगी ठरणाऱ्या कायमस्वरूपी मालमत्ता आणि जलसंधारणाच्या सुविधा निर्माण करण्याचे उद्दिष्ट आहे.
कोणत्या विभागाला किती निधी?
उपलब्ध निधीचे विभागनिहाय नियोजन करण्यात आले असून,
अमरावती विभाग – १,१४५ कोटी रुपये
कोकण विभाग – ४८९ कोटी रुपये
छत्रपती संभाजीनगर विभाग – १,९४४ कोटी रुपये
नागपूर विभाग – ११९ कोटी रुपये
पुणे विभाग – ८०१ कोटी रुपये
अशी तरतूद करण्यात आली आहे.
या योजनेतील निधीमध्ये केंद्र शासनाचा ६० टक्के आणि राज्य शासनाचा ४० टक्के वाटा राहणार आहे. दुष्काळी परिस्थितीत स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी निर्माण करून ग्रामीण कुटुंबांना आर्थिक आधार देणे, तसेच जलसंधारण आणि शेतीपूरक कामांना चालना देणे, हा या निधीमागील प्रमुख उद्देश आहे.
महाराष्ट्र वाणी | सत्यासाठी निर्भीड | जनतेसाठी समर्पित