मराठा आरक्षण प्रकरणाची पुढील सुनावणी १० जुलैला; राज्याला आणखी दोन सत्रांची गरज
महाराष्ट्र वाणी
मुंबई, प्रतिनिधी दि २७ :- मराठा एसईबीसी (SEBC) आरक्षणाविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर मुंबई उच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीची पुढील तारीख १० जुलै २०२६ निश्चित करण्यात आली आहे. न्यायालयाने हे प्रकरण दुपारी ३ वाजता सुनावणीसाठी ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
२४ जून २०२६ रोजी प्रभारी मुख्य न्यायमूर्ती रवींद्र व्ही. घुगे, न्यायमूर्ती एन. जे. जमादार आणि न्यायमूर्ती संदीप व्ही. मारणे यांच्या विशेष न्यायपीठासमोर या प्रकरणावर सुनावणी झाली. या वेळी राज्य सरकारच्या वतीने ज्येष्ठ महाधिवक्ता डॉ. मिलिंद साठ्ये यांनी दुपारी ३ ते ५ या वेळेत आपला तोंडी युक्तिवाद पुढे सुरू ठेवला.
डॉ. साठ्ये यांनी न्यायालयात 'टीप-४बी' अंतर्गत मुद्दा क्रमांक ३ संदर्भात राज्याची बाजू मांडली. तसेच राज्य सरकारचे संपूर्ण म्हणणे मांडण्यासाठी आणखी दोन सत्रांची आवश्यकता असल्याचे त्यांनी न्यायालयास सांगितले. यानंतर ज्येष्ठ वकील नानकानी आणि वकील विजय थोरात यांनीदेखील त्यांच्या बाजूने युक्तिवादासाठी एक स्वतंत्र सत्र आवश्यक असल्याचे नमूद केले.
पक्षकारांची सोय आणि सुनावणीचा वेळ लक्षात घेऊन न्यायालयाने पुढील सुनावणी १० जुलै रोजी निश्चित केली आहे. त्या दिवशी डॉ. मिलिंद साठ्ये यांना त्यांचा तोंडी युक्तिवाद पुढे सुरू ठेवता येणार आहे.
या प्रकरणातील विविध याचिकाकर्त्यांच्या वतीने वकील निहार चित्रे काम पाहत आहेत. राज्याच्या वतीने महाधिवक्ता डॉ. मिलिंद साठ्ये यांच्यासोबत सरकारी वकील नेहा भिडे, अतिरिक्त सरकारी वकील पी. पी. काकडे, जय संकलेचा, जी. आर. रघुवंशी यांच्यासह इतर वकील कामकाज पाहत आहेत.
तसेच विविध जनहित याचिकांमध्ये अतिरिक्त सरकारी वकील प्राची तटके, प्रियांका चव्हाण, मोहित जाधव यांच्यासह इतर कायदेविषयक प्रतिनिधी सहभागी आहेत.
मराठा समाजाच्या वतीने मुख्य हस्तक्षेप याचिकाकर्ते ज्येष्ठ अभ्यासक डॉ. राजेंद्र दाते पाटील यांच्या वतीने विधीज्ञ श्रेयश देशपांडे आणि मधुर अनिल गोलेगावकर हे कामकाज पाहत आहेत.
विशेष म्हणजे या सुनावणीदरम्यान मर्यादित संख्येने लोक उपस्थित राहत असून, मराठा आरक्षण मिळेपर्यंत पायात चप्पल अथवा बूट न घालण्याचा संकल्प केलेले मुख्य हस्तक्षेप याचिकाकर्ते डॉ. राजेंद्र दाते पाटील यांच्यासह प्रा. अंबादास मोहिते, प्राचार्य तांबे, रामचंद्र शेडगे, संतोष दळवी, सुभाष देसाई आणि प्रशांत भोसले आदी मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
मराठा आरक्षणाच्या सुनावणीकडे राज्यभरातील लाखो नागरिकांचे लक्ष लागले असून, १० जुलैच्या सुनावणीत महत्त्वपूर्ण घडामोडी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.