“मतदानाच्या एक दिवस आधी निवडणुका स्थगित! फडणवीसांची जोरदार नाराजी”
महाराष्ट्र वाणी
Devendra Fadnavis on Local Body Elections
मुंबई दि १ :- राज्यातील 22 नगरपरिषदांच्या अध्यक्षपदाच्या निवडणुका न्यायालयीन प्रक्रियेमुळे तात्पुरत्या पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने घेतला आहे. मागील दोन आठवड्यांपासून अनेक ठिकाणी प्रचाराचा जोरदार माहोल असताना, निवडणुका अचानक स्थगित झाल्याने उमेदवारांसह कार्यकर्त्यांचा उत्साह काहीसा कमी झाल्याचे दिसून येत आहे.
नवीन कार्यक्रमानुसार संबंधित भागांत 20 डिसेंबर रोजी मतदान आणि 21 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. मात्र इतर ठिकाणी निवडणुका 2 डिसेंबरला पूर्वनिश्चित वेळापत्रकानुसारच पार पडतील.
या निर्णयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. निवडणूक आयोगाने कायद्याचा चुकीचा अर्थ लावल्याचा आरोप त्यांनी केला.
फडणवीस म्हणाले, “उद्याच मतदान असताना एक दिवस आधी निवडणुका पुढे ढकलणे योग्य नाही. माझ्या माहितीनुसार आयोगाला अशाप्रकारे निवडणुका पुढे ढकलण्याचा अधिकार नाही. उमेदवारांच्या प्रचाराची मेहनत वाया गेली. आयोग स्वायत्त असला तरी घेतलेला निर्णय चूक आहे. आम्ही याबाबत आयोगाकडे रिप्रेझेंटेशन देणार आहोत.”
राज्यातील 246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायतींच्या निवडणुकांचा पुढील टप्पा आता 20 डिसेंबरला होणार आहे. काही ठिकाणी संपूर्ण नगरपालिका/नगरपंचायतींसाठी, तर काही ठिकाणी फक्त प्रभागांसाठी मतदान घेतले जाणार आहे. याच दिवशी झालेल्या मतमोजणीनंतर 21 डिसेंबरला निकाल जाहीर होतील.
ज्या प्रभागांतील उमेदवारांविरोधात न्यायालयीन याचिका प्रलंबित आहेत, तेथे मतदान स्थगित करण्यात आले आहे. तसेच अध्यक्षपदासाठीच्या उमेदवारांविरोधात याचिका प्रलंबित असलेल्या ठिकाणी संपूर्ण निवडणूकच पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. उमेदवारांना मिळालेल्या मर्यादित मुदती, आक्षेपांवरील विलंबित सुनावणी आणि त्याचवेळी झालेल्या चिन्हवाटपामुळे हा निर्णय घेणे अपरिहार्य झाल्याचे आयोगाने स्पष्ट केले.