बिडकीन पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात; टिप्पर सुरू ठेवण्यासाठी घेतली १ हजार रुपयांची लाच
महाराष्ट्र वाणी 📰✍️
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि. २ :- टिप्परला बिडकीन पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाहतूक करण्यास परवानगी देण्यासाठी दरमहा हप्ता मागून १ हजार रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी बिडकीन पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार भारत लालचंद चव्हाण (वय ४६) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जालना पथकाने रंगेहाथ पकडले.
तक्रारदार हे ४० वर्षीय बिल्डिंग मटेरियल सप्लायर असून त्यांच्याकडे टाटा कंपनीचे दोन ७०९ टिप्पर आहेत. या टिप्परद्वारे खडी, कच व विटांची वाहतूक केली जाते. १ सप्टेंबर रोजी तक्रारदारांचा चालक कच भरून एमआयडीसी पैठणकडे जात असताना शेकटा फाटा परिसरात पोलिसांनी टिप्पर थांबविल्याची माहिती तक्रारदारांना देण्यात आली.
यानंतर चालकाने संबंधित पोलिसाशी तक्रारदारांची फोनवरून बोलणी करून दिली. यावेळी, गाडी बिडकीन पोलीस ठाण्याच्या हद्दीत चालवायची असल्यास हप्ता द्यावा लागेल, अन्यथा गाडी चालू देणार नाही, असे सांगत बिडकीन येथे भेटण्यास सांगण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
या तक्रारीची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पडताळणी केली. पडताळणीदरम्यान तक्रारदार पत्रकार असल्याने त्यांच्या दोन टिप्परपैकी एका गाडीला सूट देऊन उर्वरित एका गाडीसाठी दरमहा १ हजार रुपये हप्ता देण्याची मागणी करण्यात आल्याचे एसीबीच्या प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
यानंतर २ सप्टेंबर रोजी पैठण-बिडकीन मार्गावरील मौजे एमआयडीसी मुद्दलवाडी हद्दीत स्वराज ऑटोमोबाईलसमोर सापळा रचण्यात आला. यावेळी टिप्पर बिडकीन पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू ठेवण्यासाठी तक्रारदाराकडून पंचांसमक्ष १ हजार रुपयांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार भारत चव्हाण याला एसीबीच्या पथकाने ताब्यात घेतले.
ही कारवाई पोलीस उपअधीक्षक बी. एस. जाधवर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. आरोपीविरुद्ध पैठण एमआयडीसी पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा, १९८८ मधील कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे एसीबीने सांगितले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक माधुरी केदार कांगणे आणि अपर पोलीस अधीक्षक शशिकांत सिंगारे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सापळा पथकात पोलीस कर्मचारी गजानन घायवाट, मनोहर भुतेकर, गणेश चेके आणि गजानन कांबळे यांचा समावेश होता.
दरम्यान, कोणत्याही लोकसेवकाकडून लाचेची मागणी होत असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन विभागाने केले आहे.