निवडणूक आचारसंहितेत मोठा निर्णय! औरंगाबाद-जालना मतदारसंघात लाऊडस्पीकरवर कडक निर्बंध
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि. २७ : औरंगाबाद-जालना जिल्हा स्थानिक प्राधिकारी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचारादरम्यान होणारे ध्वनीप्रदूषण रोखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी लाऊडस्पीकरच्या वापरावर कडक निर्बंध लागू केले आहेत.
महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम ३३ (ड) आणि (ढ) अन्वये हे आदेश जारी करण्यात आले असून, २५ मे २०२६ पासून ते २५ जून २०२६ पर्यंत म्हणजे निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत संपूर्ण जिल्ह्यात हे नियम लागू राहणार आहेत.
आदेशानुसार, कोणत्याही राजकीय पक्षाला, उमेदवाराला किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांना संबंधित पोलीस अधिकाऱ्यांची पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय ध्वनीक्षेपकाचा वापर करता येणार नाही. तसेच सकाळी ६ वाजण्यापूर्वी आणि रात्री १० नंतर फिरत्या वाहनांवर किंवा सार्वजनिक ठिकाणी लाऊडस्पीकर लावण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.
सर्व राजकीय पक्ष आणि उमेदवारांना केवळ प्रशासनाने निश्चित केलेल्या ठिकाणीच ध्वनीक्षेपक वापरण्याची परवानगी असेल. यासंदर्भातील माहिती निवडणूक निर्णय अधिकारी आणि संबंधित यंत्रणेला देणे बंधनकारक करण्यात आले आहे.
जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी स्पष्ट केले की, प्रत्येक व्यक्तीपर्यंत स्वतंत्रपणे आदेश पोहोचविणे शक्य नसल्याने पोलिस विभागामार्फत दवंडी पिटवून जनजागृती करण्यात येणार आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे.
“निवडणूक प्रचाराचा आवाज आता नियमांच्या चौकटीत; प्रशासनाचा ‘नो नॉईज’ फॉर्म्युला लागू!”