जिल्हा बँक अध्यक्षपदाच्या निवडीपूर्वी महायुतीत हालचालींना वेग! 20 जुलैला होणार फैसला

जिल्हा बँक अध्यक्षपदाच्या निवडीपूर्वी महायुतीत हालचालींना वेग! 20 जुलैला होणार फैसला

महाराष्ट्र वाणी

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची निवड २० जुलै रोजी होणार असून, या निवडीपूर्वी महायुतीतील राजकीय हालचालींना वेग आला आहे. बँकेत सर्वाधिक नऊ संचालक असलेल्या शिवसेनेत (शिंदे गट) अध्यक्षपदाच्या उमेदवारीवरून अंतर्गत मतभेद उघड होण्याची चिन्हे दिसत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, खासदार संदिपान भुमरे यांनी आमदार विलास भुमरे यांच्या नावासाठी प्रयत्न सुरू केले आहेत, तर आमदार अब्दुल सत्तार यांनी समीर सत्तार यांच्या उमेदवारीसाठी मोर्चेबांधणी केली आहे. त्यामुळे अध्यक्षपदासाठी शिंदे गटात दोन वेगवेगळे गट सक्रिय झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत महायुतीने स्पष्ट बहुमत मिळवले आहे. शिवसेनेचे ९, भाजपचे ६ आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे २ संचालक निवडून आले आहेत. याशिवाय शिवसेना (ठाकरे गट)चे आमदार अंबादास दानवे, अपक्ष म्हणून निवडून आलेले अनिल बोरसे तसेच महाविकास आघाडीचे खासदार डॉ. कल्याण काळे यांची भूमिकाही अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीत महत्त्वाची ठरू शकते.

शिवसेनेच्या नऊ संचालकांमध्ये भुमरे आणि सत्तार गटाचे प्रत्येकी तीन संचालक आहेत. तसेच पालकमंत्री संजय शिरसाट, आमदार रमेश बोरनारे आणि आमदार संजना जाधव हेही संचालक म्हणून निवडून आले आहेत.

दरम्यान, अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदासाठीची निवडणूक २० जुलै रोजी सकाळी ११ वाजता जिल्हा बँकेच्या सभागृहात होणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी समृत जाधव यांनी दिली आहे.

शिवसेनेतील अंतर्गत स्पर्धेचा फायदा भाजपला होऊ शकतो, अशीही चर्चा सुरू आहे. भाजपकडून मंत्री अतुल सावे यांचे नाव अध्यक्षपदासाठी चर्चेत असल्याचे बोलले जात आहे. अंतिम निर्णय महायुतीच्या वरिष्ठ नेतृत्वाकडून होण्याची शक्यता असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाचा कार्यकाळ महायुतीतील घटक पक्षांमध्ये अडीच-अडीच वर्षांसाठी वाटला जाऊ शकतो, अशीही राजकीय चर्चा आहे.