जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीची रणधुमाळी; विशेष सभा १८ मार्चला
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.११ :- जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष पदांच्या निवडीसाठीची विशेष सभा बुधवार, दि.१८ मार्च २०२६ रोजी आयोजित करण्यात आली आहे. ही सभा जिल्हा नियोजन समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, छत्रपती संभाजीनगर येथे होणार असल्याची माहिती पिठासीन अधिकारी तथा अपर जिल्हाधिकारी संभाजीराव अडकुणे यांनी दिली.
निवडणुकीच्या कार्यक्रमानुसार सकाळी १० ते १२ या वेळेत नामनिर्देशन पत्र स्वीकारले जाणार आहेत. त्यानंतर दुपारी २ वाजता विशेष सभेला सुरुवात होईल. सभेच्या प्रारंभी प्राप्त नामनिर्देशन पत्रांची छाननी केली जाईल. त्यानंतर उमेदवारांना नामनिर्देशन माघारी घेण्यासाठी वेळ देण्यात येणार आहे.
यानंतर निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी मराठी वर्णक्रमानुसार जाहीर केली जाईल. प्रथम अध्यक्षपदासाठी आणि त्यानंतर उपाध्यक्षपदासाठी मतदान प्रक्रिया पार पडेल. एखाद्या पदासाठी एकापेक्षा जास्त उमेदवार असल्यास हात वर करून मतदान घेण्यात येईल. मतदान करणाऱ्या सदस्यांच्या स्वाक्षऱ्या घेऊन त्याची अधिकृत नोंद केली जाणार असून संपूर्ण प्रक्रियेचे व्हिडिओ चित्रीकरण देखील केले जाणार आहे.
दरम्यान, जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्यांचे सभापती यांना विशेष सभेस उपस्थित राहण्याबाबत कळविण्यात आले आहे. मात्र, सभापतींना मतदानाचा अधिकार नसणार असल्याचेही अपर जिल्हाधिकारी संभाजीराव अडकुणे यांनी स्पष्ट केले.
— जिल्हा परिषदेत अध्यक्ष-उपाध्यक्ष पदांसाठी कोणाची बाजी लागणार, याकडे आता जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.