छत्रपती संभाजीनगर पोलीस आयुक्तालयात २०४ नवप्रविष्ठ पोलीस शिपायांचे जल्लोषात स्वागत; आयुक्तांकडून प्रेरणादायी मार्गदर्शन
महाराष्ट्र वाणी न्युज
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि १० जून :– पोलीस आयुक्तालय, छत्रपती संभाजीनगर अंतर्गत सन २०२२-२३ मधील नियमित पोलीस शिपाई भरती व अनुकंपा भरती अंतर्गत निवड झालेल्या एकूण २०८ नवप्रविष्ठ पोलीस शिपायांपैकी २०४ जणांनी पोलीस शिपाई पदाचे मुलभूत प्रशिक्षण पूर्ण करून दि. १० जून २०२५ रोजी पोलीस मुख्यालय, छत्रपती संभाजीनगर येथे हजर झाले आहेत.
प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या शिपायांमध्ये १५१ पुरुष व ५७ महिला शिपायांचा समावेश आहे. यामध्ये १३७ पुरुष शिपायांनी पोलीस प्रशिक्षण केंद्र, धुळे येथे, ५५ महिला शिपायांनी पीटीसी, तुरची-सांगली येथे, ११ पुरुष शिपायांनी पीटीसी, सोलापूर येथे, तर १ महिला शिपायाने पीटीसी, नागपूर येथे यशस्वीरीत्या अंतिम परीक्षा उत्तीर्ण केली आहे.
सद्यस्थितीत १ महिला शिपाई पीटीसी, खंडाळा येथे व ३ पुरुष शिपाई पीटीसी, मरोळ येथे प्रशिक्षण घेत आहेत.
याअनुषंगाने, आज पोलीस मुख्यालयात मा. पोलीस आयुक्त छत्रपती संभाजीनगर यांच्या हस्ते नवप्रविष्ठ पोलीस शिपायांचे औपचारिक स्वागत करण्यात आले. त्यांनी आपल्या प्रेरणादायी भाषणातून नवोदित शिपायांना मार्गदर्शन करताना म्हटले की,
"महाराष्ट्र पोलीस दलाच्या 'सद्रक्षणाय खलनिग्रहणाय' या ब्रीदवाक्यानुसार आपण चांगल्या प्रवृत्तींचे संरक्षण व वाईट प्रवृत्तींचे उच्चाटन करण्याची जबाबदारी स्वेच्छेने स्वीकारली आहे. कायदा व सुव्यवस्था राखणे हे आपले पवित्र कर्तव्य आहे. सेवा काळात स्वच्छ प्रवृत्तीने काम करा, आपली प्रकृती आणि चारित्र्य यांचे जतन करा आणि एक आदर्श पोलीस व व्यक्तिमत्व बना."
कार्यक्रमाच्या शेवटी मा. पोलीस आयुक्तांनी नवप्रविष्ठ पोलीस शिपायांना पुढील सेवेसाठी शुभेच्छा दिल्या.