गरीब व कुपोषित मुलांसाठी जिल्हा परिषद सभापती सचिन गरड यांचा मोठा निर्णय; संपूर्ण मानधन केले समर्पित
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि १६ :- समाजाप्रती असलेली बांधिलकी जपत जिल्हा परिषदेचे सभापती सचिन गरड यांनी एक प्रेरणादायी निर्णय घेतला आहे. शासनाकडून सभापती म्हणून मिळणारे संपूर्ण मानधन गरीब व कुपोषित मुलांच्या आरोग्य आणि कल्याणासाठी समर्पित करण्याची घोषणा त्यांनी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत केली.
सभागृहात हा निर्णय जाहीर होताच उपस्थित सदस्यांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचे स्वागत केले. मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि कुपोषणाविरुद्धच्या लढ्यात उचललेले हे पाऊल सामाजिक जबाबदारीचे उत्तम उदाहरण असल्याची भावना अनेक सदस्यांनी व्यक्त केली.
सचिन गरड यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, समाजातील गरीब आणि कुपोषित मुलांना योग्य पोषण, आरोग्य सुविधा आणि आवश्यक मदत मिळणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. लोकप्रतिनिधी म्हणून समाजाने दिलेल्या संधीचे ऋण फेडण्यासाठी हे मानधन मुलांच्या हितासाठी वापरण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सभागृहातील विविध राजकीय पक्षांच्या सदस्यांनी या निर्णयाचे एकमुखाने स्वागत करत, हा आदर्श इतर लोकप्रतिनिधींनीही घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. पक्षीय राजकारणापलीकडे जाऊन मुलांच्या हिताचा विचार करणारा हा निर्णय कौतुकास्पद असल्याचे सदस्यांनी नमूद केले.
जिल्ह्यात कुपोषण निर्मूलनासाठी शासनाकडून विविध योजना राबविल्या जात असल्या तरी लोकप्रतिनिधींच्या अशा सामाजिक योगदानामुळे या उपक्रमांना अधिक बळ मिळेल, असा विश्वासही सदस्यांनी व्यक्त केला.
सभापती सचिन गरड यांच्या या निर्णयाची जिल्हाभरात चर्चा सुरू असून, सामाजिक क्षेत्रातूनही त्यांचे अभिनंदन केले जात आहे.