खाटीक कुटुंबाच्या दुःखात मनियार बिरादरीचा माणुसकीचा आधार! दुःखाच्या अंधारात आशेचा प्रकाश – पीडित परिवाराला मिळाले सामाजिक सहकार्य
महाराष्ट्र वाणी
जळगाव (प्रतिनिधी)दि. ५ :- गेंदालाल मिल परिसरात नासिर रशीद खाटीक यांच्या घरी झालेल्या चोरीच्या घटनेमुळे संपूर्ण कुटुंब हादरून गेले होते. अशा कठीण प्रसंगी माणुसकीने धर्म, जात आणि बिरादरीच्या भिंती ओलांडून पीडितांच्या दारात धाव घेतली.
आज वर्तमानपत्रात ही बातमी वाचताच जळगाव जिल्हा मनियार बिरादरीचे अध्यक्ष श्री. फारुख शेख यांनी कोणतीही औपचारिकता न ठेवता आपल्या सहकाऱ्यांसह थेट पीडित कुटुंबाच्या घरी भेट दिली.
त्यांच्यासोबत युसुफ आमद, जुलकर नैन, रऊफ टेलर, अख्तर शेख, आवेश मनियार, नबील शेख, अल्ताफ शेख हे सदस्य उपस्थित होते. त्यांनी पीडित कुटुंबाची विचारपूस करून त्यांना धीर दिला.
डोळ्यांत अश्रू आणि मनात भीती घेऊन बसलेल्या कुटुंबाला मनियार बिरादरीकडून तात्काळ ₹५,५०० रुपयांची रोख आर्थिक मदत देण्यात आली.
इतकेच नव्हे, तर त्यांच्या मुलीच्या आगामी विवाहासाठी घरगुती वापरातील संपूर्ण किचन साहित्य देण्याचे आश्वासन देत त्यांनी माणुसकीचे उत्तम उदाहरण समाजासमोर ठेवले.
ही मदत केवळ आर्थिक नव्हती, तर संकटात सापडलेल्या कुटुंबासाठी आधाराचा मजबूत हात ठरली. यामुळे कुटुंबाला आर्थिकच नव्हे तर मानसिक धैर्यही मिळाले आणि समाजात भाईचाऱ्याचा संदेश पोहोचला.
ही घटना पुन्हा एकदा सिद्ध करते की धर्म, जात, बिरादरीपेक्षा मोठी माणुसकी असते.
संकटाच्या काळात समाज एकत्र उभा राहिला, तर कोणतेही दुःख खोल राहत नाही.
मनियार बिरादरीच्या या संवेदनशील आणि सामाजिक जबाबदारीच्या भूमिकेचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे.
फोटो कॅप्शन :
१) नासिर खाटीक यांना आर्थिक मदत देताना युसुफ आमद यांच्यासोबत मनियार बिरादरीचे अध्यक्ष फारुख शेख, रऊफ टेलर व इतर सदस्य.
२) नासिर खाटीक यांना धीर देताना फारुख शेख आणि सहकारी.
अशा माणुसकीच्या कृतीतूनच समाजात खरी एकता आणि बंधुभाव जिवंत राहतो!