वाळुजमध्ये अंमली पदार्थविरोधी पथकाचा धडाका! १० किलो गांजासह ६.१९ लाखांचा मुद्देमाल जप्त; दोन महिला ताब्यात

छत्रपती संभाजीनगरमध्ये गांजा विक्रीचा पर्दाफाश; महेश गायकवाड याच्याकडून गांजा आणल्याची माहिती, NDPS कायद्यान्वये गुन्हा दाखल

वाळुजमध्ये अंमली पदार्थविरोधी पथकाचा धडाका! १० किलो गांजासह ६.१९ लाखांचा मुद्देमाल जप्त; दोन महिला ताब्यात

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि. २८ :- शहरात अंमली पदार्थांच्या विक्रीला आळा घालण्यासाठी पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली असून, वाळुज परिसरात अंमली पदार्थ प्रतिबंधक पथकाने गांजा विक्रीच्या संशयावरून दोन महिलांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून १० किलो १८४ ग्रॅम गांजासदृश पदार्थ, एक मोबाईल हँडसेट आणि दुचाकी वाहन असा एकूण ६ लाख १९ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे परिसरातील अंमली पदार्थांच्या अवैध विक्रीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

हॉटेल योगराजजवळ पोलिसांची कारवाई

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २७ ऑक्टोबर रोजी अंमली पदार्थ प्रतिबंधक विभागाच्या पथकाला गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठांच्या आदेशाने छत्रपती संभाजीनगर-अहिल्यानगर रस्त्यावरील वाळुज येथील हॉटेल योगराजजवळ पथकाने कारवाई केली.

यावेळी सुनिता सुखदेव पिंपळे (वय ३२) आणि कोमल सोमनाथ पवार (वय २२), दोघीही रा. सातारा गाव, खंडोबा मंदिराजवळ, छत्रपती संभाजीनगर, या गांजासदृश अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी तो ताब्यात बाळगताना आढळल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यांच्याकडून गांजासदृश पदार्थासह मोबाईल आणि दुचाकी जप्त करण्यात आली.

गांजा कुठून आणला? तपास सुरू

प्राथमिक माहितीनुसार, संबंधित महिलांनी हा अंमली पदार्थ महेश गायकवाड (रा. गढे पिंपळगाव, ता. वैजापूर, जि. छत्रपती संभाजीनगर) याच्याकडून आणल्याचे सांगितले आहे. या प्रकरणी वाळुज पोलीस ठाण्यात NDPS कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, अंमली पदार्थांच्या पुरवठ्याच्या साखळीबाबत पुढील तपास सुरू आहे.

वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पथकाची कामगिरी

पोलीस आयुक्त प्रविण पवार, पोलीस उपायुक्त (गुन्हे) शशिकांत सातव, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) पूनम पाटील, प्रभारी सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) मजहर सय्यद आणि गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

या पथकात सहायक पोलीस निरीक्षक सचिन जाधव, पोलीस उपनिरीक्षक उत्रेश्वर मुंडे यांच्यासह अंमली पदार्थ प्रतिबंधक विभागातील अधिकारी व अंमलदार सहभागी होते.

अंमली पदार्थांची माहिती पोलिसांना देण्याचे आवाहन

शहरात कुठेही अंमली पदार्थांची विक्री, सेवन किंवा नशेसाठी जागा उपलब्ध करून देण्याचे प्रकार आढळल्यास नागरिकांनी पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. यासाठी ९६८४७०२००२ या क्रमांकावर व्हॉट्सॲपद्वारे संदेश पाठवता येणार आहे.

महाराष्ट्र वाणी | सत्यासाठी निर्भीड, जनतेसाठी समर्पित