‘हात धुवा नायक व्हा!’; १५ ऑक्टोबरला जिल्हाभर जनजागृतीचा जागर, अविनाश गलांडे व मिन्नू पी. एम. यांचे आवाहन
गावोगावी शाळा, अंगणवाड्या आणि आरोग्य केंद्रांत विविध उपक्रम; साबणाने हात धुण्याची सवय रुजविण्यावर भर
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि. १४ :- संसर्गजन्य आजारांना प्रतिबंध घालण्यासाठी आणि नागरिकांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी हातांची स्वच्छता अत्यंत महत्त्वाची आहे. याच पार्श्वभूमीवर १५ ऑक्टोबर रोजी जागतिक हात धुवा दिनानिमित्त जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती, प्राथमिक आरोग्य केंद्रे, आरोग्य उपकेंद्रे, पशुवैद्यकीय दवाखाने, शाळा आणि अंगणवाड्यांमध्ये विविध जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात येणार आहेत. ‘हात धुवा नायक व्हा’ (Be a Handwashing Hero) ही यंदाची संकल्पना असून, जिल्हाभर हा दिवस उत्साहात साजरा करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अविनाश गलांडे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू पी. एम. यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
हातांच्या स्वच्छतेतून आजारांना प्रतिबंध
दरवर्षी १५ ऑक्टोबर हा दिवस जागतिक हात धुवा दिन म्हणून साजरा केला जातो. सन २००८ पासून या दिनाच्या माध्यमातून हात स्वच्छ धुण्याचे महत्त्व समाजापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला जात आहे. साबणाने योग्य पद्धतीने हात धुणे हा अतिशय सोपा, प्रभावी आणि परवडणारा उपाय आहे. या सवयीमुळे अतिसारासह अनेक संसर्गजन्य आजारांचा धोका कमी करण्यास मदत होते.
जेवणापूर्वी, शौचालयाचा वापर केल्यानंतर तसेच हात अस्वच्छ झाल्यावर साबणाने हात धुणे आवश्यक आहे. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि सर्वसामान्यांमध्ये स्वच्छतेच्या चांगल्या सवयी रुजविण्यासाठी व्यापक जनजागृती करण्यावर भर देण्यात येणार आहे.
हात धुण्याची योग्य पद्धत कोणती?
हात धुताना केवळ तळवे स्वच्छ करणे पुरेसे नसून बोटांमधील जागा, नखांखालील भाग आणि मनगटही स्वच्छ करणे गरजेचे आहे. हात धुण्याची योग्य पद्धत पुढीलप्रमाणे आहे.
- स्वच्छ वाहत्या पाण्याने हात ओले करावेत.
- हातांवर पुरेसा साबण किंवा हँडवॉश लावावा.
- दोन्ही हातांचे तळवे, हातांची मागील बाजू, बोटांमधील जागा, नखांखालील भाग आणि मनगट किमान २० सेकंद चोळून स्वच्छ करावे.
- स्वच्छ पाण्याने हात धुवावेत आणि स्वच्छ टॉवेलने किंवा योग्य पद्धतीने हात कोरडे करावेत.
ग्रामपंचायत ते अंगणवाडीपर्यंत जनजागृतीचे निर्देश
जागतिक हात धुवा दिनानिमित्त आयोजित उपक्रमांचे नियोजन गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी आणि बालविकास प्रकल्प अधिकारी यांनी आपापल्या स्तरावर करावे, असे निर्देश देण्यात आले आहेत. राबविण्यात आलेल्या उपक्रमांचा व्हिडिओ आणि छायाचित्रांसह सचित्र अहवाल २० ऑक्टोबर २०२६ पर्यंत सादर करण्यासही सांगण्यात आले आहे.
पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राघवेंद्र घोरपडे आणि पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी साहेबराव चव्हाण यांच्यामार्फत यासंदर्भात पत्राद्वारे सूचना देण्यात आल्या आहेत.
निरोगी समाजासाठी स्वच्छतेचा संकल्प करा!
गावागावांमध्ये स्थानिक प्रतिष्ठित नागरिक, लोकप्रतिनिधी, ग्रामविकास अधिकारी, मुख्याध्यापक आणि संबंधित यंत्रणांनी एकत्रितपणे या मोहिमेत सहभागी व्हावे. ग्रामपंचायती, आरोग्य केंद्रे, शाळा आणि अंगणवाड्यांमध्ये ‘हात धुवा नायक व्हा’ हा संदेश प्रभावीपणे पोहोचवून नागरिकांमध्ये हात स्वच्छ धुण्याची सवय रुजवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
हे आवाहन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अविनाश गलांडे, मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू पी. एम., उपाध्यक्ष जितेंद्र जयस्वाल, बांधकाम सभापती सचिन गरड, समाजकल्याण सभापती बालाजी सोनटक्के, आरोग्य व शिक्षण सभापती अनिताताई ज्ञानेश्वर मोठे, महिला व बालकल्याण सभापती मीनाक्षीताई किशोर पवार आणि अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके यांनी केले आहे.
महाराष्ट्र वाणी | सत्यासाठी निर्भीड, जनतेसाठी समर्पित