“आरोप म्हणजे दोष सिद्ध नाही; न्यायालयावर पूर्ण विश्वास” – असदुद्दीन ओवेसी यांचे स्पष्टीकरण
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि. ९ :- नाशिक येथील टीसीएस कंपनीशी संबंधित प्रकरणावर सुरू असलेल्या मीडिया ट्रायलवर एमआयएमचे सुप्रीमो तथा खासदार Asaduddin Owaisi यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी सांगितले की, संबंधित प्रकरणात अनेक गोष्टी चुकीच्या पद्धतीने मांडल्या जात असून द्वेषाचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
ओवेसी म्हणाले की, टीसीएस कंपनीने स्वतः स्पष्ट केले आहे की नीदा खान ही एचआर मॅनेजर नव्हती आणि तिने कंपनी सोडली होती. तिच्याविरोधात दाखल एफआयआरमध्ये धार्मिक भावना भडकवल्याचा आरोप आहे, धर्मांतराचा नाही. अशा परिस्थितीत माध्यमांकडून चुकीची माहिती प्रसारित केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
“एखाद्याकडे बुरखा किंवा धार्मिक ग्रंथ सापडणे हा गुन्हा ठरू शकत नाही. उच्चशिक्षित युवक-युवतींना लक्ष्य करून त्यांचे भविष्य उद्ध्वस्त करण्याचे षडयंत्र रचले जात आहे,” असेही ते म्हणाले.
यावेळी त्यांनी मालेगाव आणि मुंबई रेल्वे बॉम्बस्फोट प्रकरणांचा उल्लेख करत अनेक निष्पाप लोकांना वर्षानुवर्षे न्यायासाठी संघर्ष करावा लागल्याचे सांगितले. “आरोप ठेवले म्हणजे व्यक्ती दोषी ठरत नाही. न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण होऊ द्या. आम्हाला न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे आणि नीदा खानला न्याय मिळेल,” असे ओवेसी यांनी स्पष्ट केले.
एमआयएमवर होत असलेल्या आरोपांचाही त्यांनी इन्कार केला. नगरसेवक मतीन पटेल यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांबाबत चौकशीला सामोरे जाण्याची तयारी असल्याचे त्यांनी सांगितले. “राज्यात अनेक आमदार-खासदारांवर गुन्हे दाखल आहेत. अंतिम निर्णय न्यायालयच देईल,” असेही ते म्हणाले.
वंदे मातरम् सक्तीबाबत विचारलेल्या प्रश्नावर ओवेसी यांनी केंद्र सरकारच्या भूमिकेवर टीका केली. रविंद्रनाथ टागोर यांच्या विचारांचा संदर्भ देत त्यांनी सांगितले की, “टागोर यांच्यासारख्या महान व्यक्तींच्या विचारांपेक्षा सध्याचे सत्ताधारी मोठे असू शकत नाहीत.”
या पत्रकार परिषदेला प्रदेशाध्यक्ष Imtiaz Jaleel आणि माजी आमदार Waris Pathan उपस्थित होते.
राजकीय आरोप-प्रत्यारोपांदरम्यान न्यायालयीन प्रक्रियेवर सर्वांचे लक्ष लागले आहे.