सारसबाग बंद ठेवल्याने मुस्लिम समाजात नाराजी; महाराष्ट्र मुस्लिम कॉन्फरन्सचा आयुक्तांना जाहीर निषेध!
महाराष्ट्र वाणी न्युज
पुणे, दि. 9 जून :- बकरी ईदनंतरच्या दुसऱ्या दिवशी साजरी होणाऱ्या बाशी ईद निमित्त मुस्लिम बांधव नेहमीप्रमाणे पुण्यातील विविध उद्यानांमध्ये गर्दी करतात. मात्र, यंदा सारसबाग उद्यान बंद ठेवण्यात आल्याने मुस्लिम समाजात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. या घटनेचा महाराष्ट्र मुस्लिम कॉन्फरन्सच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला असून, पुणे महानगरपालिकेचे आयुक्त नवल किशोर राम व निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांना निवेदन देण्यात आले आहे.
निवेदनाद्वारे यावेळी असे सांगण्यात आले की, सारसबाग सारख्या महत्त्वाच्या सार्वजनिक ठिकाणी विनाकारण प्रवेशबंदी करणे हे नागरिकांच्या घटनात्मक अधिकारांवर गदा आणणारे आहे. त्यामुळे उद्यान विभागातील जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे.
मुस्लिम समाजाच्या धार्मिक व सामाजिक भावना दुखावल्याने, महापालिका आयुक्तांनी तत्काळ जाहीर माफी मागावी, अशी विनंतीही या वेळी करण्यात आली.
या वेळी महाराष्ट्र मुस्लिम कॉन्फरन्सचे संस्थापक अध्यक्ष हाजी जुबेर मेमन, आझाद समाज पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश युवक अध्यक्ष सुलतान शहा, पुणे शहर अध्यक्ष फरीद खान, महिला अध्यक्षा फरहीन सय्यद, युवा अध्यक्ष गौस शेख, डॉ. फरदीस सय्यद, हसीना काझी, वंदना कांबळे, पन्ना कोडीतकर यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.