५ वर्षीय सय्यद उमरेन आणि मुस्तफा यांचा पहिला रोजा; नगरदेवळ्यात कौतुकाचा वर्षाव
महाराष्ट्र वाणी
नगरदेवळा दि २४ :– इस्लाम धर्मातील पवित्र रमजान महिन्याला विशेष आध्यात्मिक महत्त्व आहे. या महिन्यात मुस्लिम बांधव अल्लाहची इबादत करत रोजा (उपवास) पाळतात. साधारणपणे वयाच्या दहाव्या वर्षापासून रोजा फर्ज (अनिवार्य) मानला जातो; मात्र लहान मुलांमध्येही धार्मिक संस्कारांची बीजं लहानपणापासूनच रुजवली जातात.
याच भावनेतून नगरदेवळा येथील सय्यद इमरान अली आसिफ अली यांची अवघ्या ५ वर्षांची दोन मुले — सय्यद उमरेन अली इमरान अली आणि सय्यद मुस्तफा अली इमरान अली — यांनी सोमवार, दि. २३ फेब्रुवारी रोजी आपल्या आयुष्यातील पहिला रोजा यशस्वीरित्या पूर्ण केला.
रमजानमध्ये रोजा पहाटे सुमारे ५.२० वाजता सुरू होतो आणि सायंकाळी ६.२२ वाजता इफ्तारनंतर सोडला जातो. म्हणजे तब्बल १३ तासांहून अधिक काळ अन्न-पाण्याचा त्याग करावा लागतो. वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर हा उपवास मोठ्यांनाही आव्हानात्मक ठरतो. अशा परिस्थितीत एवढ्या लहान वयात दोन्ही चिमुकल्यांनी पहिलाच रोजा पूर्ण केल्याने परिसरात त्यांचे विशेष कौतुक होत आहे.
धार्मिक कर्तव्याची जाणीव आणि चांगल्या संस्कारांची सुरुवात लहानपणापासून व्हावी, या उद्देशाने त्यांनी हा रोजा ठेवला. कुटुंबीय आणि समाजबांधवांकडून दोघांवर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या या कृतीमुळे इतर बालकांनाही प्रेरणा मिळत आहे.
👉 लहान वयात मोठी जिद्द… उमरेन आणि मुस्तफाचा पहिला रोजा नगरदेवळ्यासाठी ठरला अभिमानाचा क्षण!