“सायकलने बदललं आयुष्य!” – अधिकाऱ्याचा प्रेरणादायी प्रवास; होतकरू मुलींना सायकल वाटपातून शिक्षणाला नवी गती

“सायकलने बदललं आयुष्य!” – अधिकाऱ्याचा प्रेरणादायी प्रवास; होतकरू मुलींना सायकल वाटपातून शिक्षणाला नवी गती
“सायकलने बदललं आयुष्य!” – अधिकाऱ्याचा प्रेरणादायी प्रवास; होतकरू मुलींना सायकल वाटपातून शिक्षणाला नवी गती

महाराष्ट्र वाणी 

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि ३० :- “सायकलमुळेच मी आज शासकीय अधिकारी झालो,” अशी भावनिक आठवण सांगत सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण यांनी फुलंब्री विधानसभा मतदारसंघातील होतकरू विद्यार्थिनींना सायकल वाटप करत एक प्रेरणादायी संदेश दिला.

लहानपणी अनेक किलोमीटर अंतर पायी चालत शाळेत जावं लागत होतं. त्या प्रवासात वेळ आणि ऊर्जा दोन्ही खर्च होत होते. मात्र सायकल मिळाल्यानंतर आयुष्यात मोठा बदल झाला. वेळेची बचत होऊ लागली आणि त्या वाचलेल्या वेळेचा उपयोग अभ्यासासाठी केल्यामुळेच आज हा टप्पा गाठता आला, असे चव्हाण यांनी सांगितले.

“सायकल हे केवळ प्रवासाचं साधन नसून वेळ वाचवण्याचं प्रभावी माध्यम आहे. त्या वेळेची योग्य ‘इन्वेस्टमेंट’ केली तर आयुष्य घडू शकतं,” असेही त्यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना स्पष्ट केले.

या उपक्रमांतर्गत फुलंब्री मतदारसंघातील अनेक गरजू मुलींना सायकलींचे वाटप करण्यात आले. सायकल मिळाल्यानंतर विद्यार्थिनींच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद आणि उत्साह पाहून समाधान वाटल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. या सायकली त्यांच्या शिक्षणाचा वेग वाढवून, उज्ज्वल भविष्यासाठी नवी दारे उघडतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

या उपक्रमासाठी सहकार्य करणाऱ्या छत्रपती संभाजीनगर - जालना टोलवेज लिमिटेड यांचेही त्यांनी आभार मानले. अशा सामाजिक उपक्रमांमुळे शिक्षणाला चालना मिळते आणि भविष्यात सक्षम पिढी घडण्यास मदत होते, असेही त्यांनी नमूद केले.

शिक्षणासाठी जिद्द आणि वेळेचे नियोजन महत्त्वाचे असून, योग्य दिशेने प्रयत्न केल्यास कोणतीही अडचण यशाच्या आड येऊ शकत नाही, असा प्रेरणादायी संदेश त्यांनी दिला.

 “वेळेची कदर करा... सायकलचा वेग तुमचं भविष्यही बदलू शकतो!”

🚲 “सायकलने बदललं आयुष्य!” – अतुल चव्हाण यांचा प्रेरणादायी प्रवास; होतकरू मुलींना सायकल वाटपातून शिक्षणाला नवी गती