शिवणा येथील दोन मनोरुग्ण महिलांना अजिंठा पोलिसांची माणुसकीची साथ; एकीला येरवडा, तर दुसरीला सेवालयात दाखल
महाराष्ट्र वाणी
सिल्लोड (प्रतिनिधी) दि ५ :- अजिंठा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिवणा गावातील मानसिक आजाराने त्रस्त असलेल्या दोन महिलांना अजिंठा पोलिसांनी आणि माणुसकी समूहाने मदतीचा हात देत उपचारासाठी दाखल केले आहे. एका महिलेला पुण्यातील येरवडा प्रादेशिक मनोरुग्णालयात, तर दुसऱ्या महिलेला छत्रपती संभाजीनगर येथील माणुसकी वृद्ध सेवालयात तात्पुरता निवारा देण्यात आला आहे.
सुनीता कडुबा इंगळे (वय ४०) आणि वंदना सीताराम जगताप (वय ३५, रा. शिवणा, ता. सिल्लोड) या दोन्ही महिला अनेक वर्षांपासून मानसिक आजाराने त्रस्त आहेत. वृद्ध आई-वडिलांना त्यांची देखभाल करणे कठीण होत असल्याने, तसेच महिलांच्या आक्रमक वर्तनामुळे परिसरातील नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला होता.
या प्रकरणी ग्रामपंचायत आणि नातेवाईकांनी अजिंठा पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. त्यानंतर अजिंठा पोलिसांनी सामाजिक कार्यकर्ते सुमित पंडित आणि सु-लक्ष्मी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेशी संपर्क साधून मदतकार्य सुरू केले.
दोन्ही महिलांना प्रथम छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पुढील उपचारासाठी पुण्यातील येरवडा प्रादेशिक मनोरुग्णालयात नेण्यात आले.
डॉक्टरांनी तपासणीनंतर वंदना जगताप यांच्यावर येरवडा येथे उपचार सुरू करण्याचा निर्णय घेतला, तर सुनीता इंगळे यांना तात्पुरत्या निवाऱ्यासाठी आणि औषधोपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील माणुसकी वृद्ध सेवालयात दाखल करण्यात आले.
हे मदतकार्य उपविभागीय पोलिस अधिकारी विश्वजित काईगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. सहाय्यक पोलिस निरीक्षक सुधीर मोटे, पवन इंगळे, पोलिस उपनिरीक्षक बाबासाहेब भवर, भागवत शेळके, पोलीस कर्मचारी तसेच समाजसेवक सुमित पंडित, के. के. जगताप, ज्ञानेश्वर जगताप आणि पूजा पंडित यांनी विशेष सहकार्य केले.
सहाय्यक पोलिस निरीक्षक सुधीर मोटे यांनी माणुसकी समूहाच्या कार्याचे कौतुक करताना सांगितले की, "मानसिक आजाराने ग्रस्त व्यक्तींसाठी काम करणे अत्यंत संवेदनशील आणि धाडसाचे आहे. समाजसेवक सुमित पंडित आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी निस्वार्थ भावनेने केलेले हे कार्य खरोखरच कौतुकास्पद आहे."