पदापेक्षा माणुसकी मोठी! सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी पूर्ण केली रज्जाक मामूंची अनेक वर्षांची इच्छा

पदापेक्षा माणुसकी मोठी! सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी पूर्ण केली रज्जाक मामूंची अनेक वर्षांची इच्छा
पदापेक्षा माणुसकी मोठी! सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी पूर्ण केली रज्जाक मामूंची अनेक वर्षांची इच्छा

महाराष्ट्र वाणी

मुंबई दि २ :- समाजात पद, प्रतिष्ठा आणि अधिकार यापेक्षा माणुसकी मोठी असते, याचा सुंदर अनुभव नुकताच पाहायला मिळाला. गेली तब्बल ३५ वर्षे प्रामाणिकपणे मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या घरी स्वयंपांकी म्हणून सेवा देणारे रज्जाक मामू शेख यांच्या आयुष्यातील एक खास स्वप्न अखेर पूर्ण झाले.

महाराष्ट्राच्या लोकशाहीचे केंद्र मानल्या जाणाऱ्या विधान भवनाला भेट देण्याची रज्जाक मामूंची अनेक वर्षांची इच्छा होती. ही भावना ओळखून सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी स्वतः त्यांना विधान भवनात घेऊन जात त्यांचे स्वप्न पूर्ण केले.

विधान भवनात प्रवेश करताना रज्जाक मामू यांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद, समाधान आणि कृतज्ञतेची भावना उपस्थितांच्या मनाला स्पर्श करून गेली. हा केवळ एका व्यक्तीचा आनंद नव्हता, तर प्रत्येक कष्टकरी, प्रामाणिक आणि निःस्वार्थ भावनेने काम करणाऱ्या व्यक्तीच्या सन्मानाचा क्षण ठरला.

रज्जाक मामू गेली अनेक वर्षे आत्मीयतेने आणि प्रेमाने स्वयंपाक करत आहेत. त्यांच्या हातच्या जेवणातून केवळ चव नाही, तर आपुलकी, जिव्हाळा आणि सेवाभावाची अनुभूती मिळते. त्यांच्या कार्याचा सन्मान करत त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्याचा हा क्षण अनेकांसाठी प्रेरणादायी ठरला.

समाजात कोणतेही काम लहान नसते आणि प्रत्येक व्यक्तीच्या स्वप्नाला तितकेच महत्त्व असते. माणुसकीची खरी ओळख पदात नसून, दुसऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करण्यात असते, हे या प्रसंगातून पुन्हा एकदा अधोरेखित झाले.

— प्रत्येकाचा आनंद महत्त्वाचा... कारण माणुसकीच सर्वात मोठी ओळख असते!