”राखीच्या धाग्यातून माणुसकीची नाती; घाटीत गरजू महिला रुग्णांसोबत रक्षाबंधनाचा अनोखा उपक्रम

”राखीच्या धाग्यातून माणुसकीची नाती; घाटीत गरजू महिला रुग्णांसोबत रक्षाबंधनाचा अनोखा उपक्रम
”राखीच्या धाग्यातून माणुसकीची नाती; घाटीत गरजू महिला रुग्णांसोबत रक्षाबंधनाचा अनोखा उपक्रम

महाराष्ट्र वाणी

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि २७ :- रक्षाबंधन हा भाऊ-बहिणीच्या प्रेमाचा सण. मात्र, याच सणाला माणुसकीची जोड देत गरजू आणि उपचारासाठी रुग्णालयात दाखल असलेल्या महिला रुग्णांसोबत रक्षाबंधन साजरे करण्याचा अनोखा उपक्रम यंदाही राबविण्यात येणार आहे.

सु-लक्ष्मी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था आणि माणुसकी समूह टीमच्या वतीने शुक्रवारी घाटी रुग्णालयात हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. या उपक्रमाचे हे नववे वर्ष आहे.

दरवर्षीप्रमाणे यंदाही घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल महिला रुग्णांना राखी बांधून त्यांना एक राखी आणि एक साडी भेट देण्यात येणार आहे. तसेच गरजू रुग्णांना त्यांच्या आवश्यकतेनुसार रोख मदत, औषधे आणि इतर जीवनावश्यक वस्तू देण्यात येणार आहेत.

कुटुंबीय आणि नातेवाईकांसोबत सण साजरे करणे ही परंपरा आहे. मात्र, ज्यांना आजारपणामुळे रुग्णालयातच सण साजरा करावा लागतो, अशा गरजू रुग्णांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हास्य फुलावे, त्यांना आपण एकटे नाही तर समाज आपल्या सोबत आहे, याची जाणीव व्हावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविला जात आहे.

‘धागा शौर्याचा, राखी अभिमानाची’ या भावनेसोबतच यंदा माणुसकीचा धागाही अधिक घट्ट करण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. समाजातील दानशूर व्यक्तींनी या उपक्रमात सहभागी होऊन एका गरजू महिलेसाठी साडी देण्यासाठी आर्थिक मदत करावी, तसेच ज्यांच्याकडे नवीन साड्या उपलब्ध असतील त्यांनी त्या देऊन या उपक्रमाला हातभार लावावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

या उपक्रमासाठी मदत करू इच्छिणाऱ्यांनी माणुसकी समूह टीम : 7588928822 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे समाजसेवक सुमित पंडित यांनी सांगितले.

एका साडीची मदत म्हणजे एका गरजू महिलेच्या चेहऱ्यावर उमटणारे आनंदाचे हास्य… रक्षाबंधनाच्या या पवित्र सणाला माणुसकीच्या नात्याने जोडण्यासाठी आपणही या उपक्रमात सहभागी व्हा!