मालेगावच्या दमदार विजयानंतर इस्लाम पार्टीची राज्यभर झेप; माजी आमदार आसिफ शेख २ मार्चला संभाजीनगरात
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद)दि. २८ :- मालेगाव महानगरपालिका निवडणुकीत उल्लेखनीय यश मिळवल्यानंतर माजी आमदार आसिफ शेख यांच्या नेतृत्वाखालील इस्लाम पार्टी आता संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरली आहे. निवडणुकीच्या अगदी काही काळ आधी स्थापन झालेल्या या पक्षाने पहिल्याच निवडणुकीत तब्बल ३५ नगरसेवक निवडून आणत राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे.
इस्लाम पार्टीने समाजवादी पक्षासोबत आघाडी करून निवडणूक लढवली आणि एकूण ४० जागांवर विजय मिळवला. यात इस्लाम पार्टीचे ३५ तर समाजवादी पक्षाचे ५ नगरसेवक निवडून आले. याशिवाय भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या तीन नगरसेवकांच्या पाठिंब्यामुळे महापौरपद इस्लाम पार्टीला तर उपमहापौरपद समाजवादी पक्षाला मिळाले. या राजकीय समीकरणानंतर आसिफ शेख यांचे राज्याच्या राजकारणातील वजन लक्षणीयरीत्या वाढल्याची चर्चा सुरू झाली आहे.
निवडणुकीतील यशानंतर मालेगाव येथे आयोजित राज्यस्तरीय बैठकीला महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधून हजारो कार्यकर्ते उपस्थित होते. या बैठकीत इस्लाम पार्टीचा राज्यभर विस्तार करण्याची मागणी जोर धरू लागली. छत्रपती संभाजीनगर शहरातूनही मोठ्या संख्येने माजी नगरसेवक व कार्यकर्त्यांनी या बैठकीत सहभाग नोंदवला.
पक्ष विस्ताराच्या पार्श्वभूमीवर संभाजीनगर शहराची जबाबदारी माजी नगरसेवक राफतयार खान आणि कलीम कुरैशी यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. त्याच अनुषंगाने २ मार्च २०२६ रोजी शहरातील कटकट गेट परिसरातील इम्प्रेल लॉन्स येथे इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले असून, या कार्यक्रमाला इस्लाम पार्टीचे संस्थापक अध्यक्ष व माजी आमदार आसिफ शेख प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
राफतयार खान, कलीम कुरैशी, आरीफ हुसैनी, अबुल हसन हाश्मी, जुबेर लाला, जमील जलाल भाई, जफर बिल्डर, सलीम पटेल बोरगाकर आदी माजी नगरसेवकांनी शहरवासीयांना आवाहन केले आहे की, मोठ्या संख्येने इस्लाम पार्टीमध्ये सहभागी व्हावे व पक्षाच्या राज्यव्यापी विस्तार मोहिमेला बळ द्यावे.
मालेगावच्या विजयामुळे इस्लाम पार्टीची वाढती सक्रियता आता राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना तोंड फोडत आहे. आगामी काळात पक्षाचा विस्तार कोणत्या दिशेने होणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
— “मालेगावच्या विजयानंतर संभाजीनगरात राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे?” अशी चर्चा आता रंगू लागली आहे.