बुढ्ढीलाईनमध्ये गुन्हे शाखेचा सापळा यशस्वी! चार एम.डी. ड्रग्स तस्कर अटकेत; १० लाखांचा मुद्देमाल जप्त
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि २९ :- शहरातील अंमली पदार्थविरोधी मोहिमेला मोठे यश मिळवत गुन्हे शाखेने बुढ्ढीलाईन परिसरात धडक कारवाई करत चार एम.डी. ड्रग्स तस्करांना अटक केली आहे. या कारवाईत तब्बल १० लाख ७९ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सिटीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 100/2026 अंतर्गत NDPS कायद्याच्या कलम 8(c), 21(b), 29 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक प्रविण वाघ यांनी फिर्याद दिली आहे.
गुप्त माहितीवरून सापळा
दि. 28 मार्च रोजी सायंकाळी 5.20 वाजण्याच्या सुमारास नेहरू भवन जवळ, बुढ्ढीलाईन येथे गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचला. यावेळी सलमान शेख हा आपल्या साथीदारांसह एम.डी. ड्रग्स विक्रीसाठी येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती.
अंगझडतीत एम.डी. पावडर जप्त
कारवाईदरम्यान पोलीसांनी चारही आरोपींना ताब्यात घेतले. आरोपी सोहेल शेख याच्याकडून 49.31 ग्रॅम एम.डी. पावडर जप्त करण्यात आली. तसेच इतर आरोपींकडून रोख रक्कम व मोबाईल फोन जप्त करण्यात आले.
अटक आरोपींची नावे:
सोहेल मेहमुद शेख (वय 24)
सलमान मेहमुद शेख (वय 26)
अब्दुल रहेमान अदनान हिलाबी (वय 26)
शेख जुनैद अब्दुल रऊफ (वय 23)
(फरहान नावाचा एक आरोपी फरार असून त्याचा शोध सुरू आहे.)
कोठून येतोय ड्रग्सचा पुरवठा?
प्राथमिक तपासात सलमान व सोहेल शेख हे दोघे मिळून एम.डी. ड्रग्सची विक्री करत असल्याचे समोर आले आहे. अंमली पदार्थाचा पुरवठा नेमका कुठून होत होता आणि शहरात कोणाला विक्री केली जाणार होती, याचा सखोल तपास पोलीस करत आहेत.
ही कारवाई पोलीस आयुक्त प्रविण पवार, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) रत्नाकर नवले आणि सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
शहरात सुरू असलेल्या अंमली पदार्थविरोधी विशेष मोहिमेमुळे ड्रग्स तस्करांवर पोलिसांचा दबाव वाढला असून नागरिकांनीही अशा प्रकारची माहिती पोलीसांना देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
“ड्रग्सविरोधात पोलिसांचा ‘स्ट्राईक’ सुरूच... पुढचा नंबर कोणाचा?”