सिल्लोड-कन्नड तालुक्यात वीजेचा कहर; पती-पत्नींसह तीन महिलांचा मृत्यू

सिल्लोड-कन्नड तालुक्यात वीजेचा कहर; पती-पत्नींसह तीन महिलांचा मृत्यू
सिल्लोड-कन्नड तालुक्यात वीजेचा कहर; पती-पत्नींसह तीन महिलांचा मृत्यू

महाराष्ट्र वाणी

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि १७ :- जिल्ह्यात गुरुवारी दुपारी वादळी वातावरणासह झालेल्या पावसादरम्यान वीज पडण्याच्या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये पती-पत्नींसह पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनांमध्ये काही जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

दहिगाव शिवारात वीज पडून पती-पत्नीचा मृत्यू

सिल्लोड तालुक्यातील दहिगाव शिवारात गुरुवारी दुपारी अचानक वादळी वातावरण निर्माण झाले. पावसापासून बचाव करण्यासाठी शेतातील झोपडीत आसरा घेतलेल्या मनोहर भिवसन दुधे (60) आणि त्यांच्या पत्नी पर्वताबाई मनोहर दुधे (57) यांच्या अंगावर अचानक वीज कोसळली.

या दुर्घटनेत दोघेही गंभीररीत्या भाजले असून त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती आहे. त्यांच्यासोबत असलेला मुलगाही वीजेच्या धक्क्याने बेशुद्ध झाला. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारानंतर मुलगा शुद्धीवर आला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

या घटनेमुळे दहिगाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

पिशोर येथे तीन महिलांचा मृत्यू

दरम्यान, कन्नड तालुक्यातील पिशोर परिसरातही वीज पडून मोठी दुर्घटना घडली. येथे वीज पडल्याने तीन महिलांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. या घटनेत अन्य दोन महिला आणि एक पुरुष जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे हलविण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

दोन्ही घटनांमुळे सिल्लोड आणि कन्नड तालुक्यात शोककळा पसरली आहे. प्रशासनाकडून घटनांची माहिती घेऊन पुढील कार्यवाही सुरू असल्याचे समजते.