दुःखाच्या प्रसंगी शासन कुटुंबीयांच्या पाठीशी; आमदार सत्तार यांची दहिगाव-पिशोरला भेट
सिल्लोड (प्रतिनिधी) दि. १९ :- सिल्लोड तालुक्यातील दहिगाव शिवार आणि कन्नड तालुक्यातील पिशोर परिसरात १७ सप्टेंबर रोजी वीज कोसळण्याच्या दोन दुर्दैवी घटना घडल्या. या दुर्घटनांमध्ये दहिगाव शिवारात मनोहर दुधे आणि पार्वताबाई दुधे या दाम्पत्याचा मृत्यू झाला. तर पिशोर परिसरातील वाहुळखेडा येथे वीज कोसळून अलविरा सय्यद, फरजाना सय्यद आणि तस्लीम बानू सय्यद या तीन महिला मजुरांचा मृत्यू झाला.
या दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर माजी मंत्री तथा आमदार अब्दुल सत्तार यांनी १८ सप्टेंबर रोजी दहिगाव आणि पिशोर येथे जाऊन मृतांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी त्यांनी कुटुंबीयांशी संवाद साधत दुःखात सहभागी होत त्यांना धीर दिला.
दहिगाव येथे आमदार सत्तार यांनी मनोहर दुधे आणि पार्वताबाई दुधे यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. अचानक घडलेल्या या दुर्घटनेबद्दल त्यांनी शोक व्यक्त केला. या घटनेत दाम्पत्याचा मुलगा पंढरी मनोहर दुधे जखमी झाला आहे. सत्तार यांनी त्याचीही भेट घेऊन प्रकृतीची माहिती घेतली आणि आवश्यक ती मदत करण्याचे आश्वासन दिले.
यानंतर आमदार सत्तार यांनी पिशोर येथे जाऊन वाहुळखेडा परिसरातील वीज दुर्घटनेत मृत्यू झालेल्या तीन महिला मजुरांच्या कुटुंबीयांची आणि नातेवाईकांची भेट घेतली. त्यांनी कुटुंबीयांशी संवाद साधून त्यांच्या दुःखात सहभागी होत संवेदना व्यक्त केल्या. तसेच दुर्घटनेत जखमी झालेल्या व्यक्तींच्या प्रकृतीचीही त्यांनी माहिती घेतली.
‘दुःखाच्या या कठीण प्रसंगी कुटुंबीयांनी धीर धरावा. राज्य शासन आपल्या पाठीशी आहे. मृतांच्या कुटुंबीयांना शासनाच्या माध्यमातून जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी आपण आवश्यक तो पाठपुरावा करू,’ अशी ग्वाही आमदार अब्दुल सत्तार यांनी दिली.
घटनेबाबत संबंधित शासकीय अधिकाऱ्यांकडून त्यांनी माहिती घेतली. तसेच मृतांच्या कुटुंबीयांना शासनाकडून मिळणाऱ्या मदतीसाठी आवश्यक ती कार्यवाही तत्काळ करण्याच्या सूचनाही संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख डॉ. मनोज राठोड, जिल्हा परिषद सदस्य केतन काजे, जिल्हा बँकेचे संचालक अर्जुन गाढे, पंचायत समितीचे माजी सभापती अजिज बागवान, पंचायत समिती सदस्य निजाम पठाण आदी उपस्थित होते.
पिशोर येथे नायब तहसीलदार राजकुमार खेत्रे, तालुका कृषी अधिकारी संदीप शिरसाट, पुंडलिक डहाके, नारायण खडके, पंचायत समिती सदस्य युसुफ पठाण, गोकुळ डहाके, बबलू मोकासे, दिलीप आप्पा, तलाठी केवलचंद्र बहुरे, कृषी सहाय्यक मनीष राठोड यांच्यासह अधिकारी, पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते.
महाराष्ट्र वाणी | सत्यासाठी निर्भीड | जनतेसाठी समर्पित