गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील दागिने लंपास करणाऱ्या ३ महिला ताब्यात; ६५ हजारांचा मुद्देमाल जप्त
गजानन महाराज मंदिर परिसरात मंगळसूत्र चोरट्या टोळीचा पर्दाफाश!
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि १५ :- गणपतीची मूर्ती आणि पूजेचे साहित्य खरेदी करण्यासाठी गजानन महाराज मंदिर परिसरात आलेल्या महिलांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र गर्दीचा फायदा घेत चोरी करणाऱ्या तीन महिलांना जवाहरनगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून चोरीस गेलेली दोन सोन्याची मंगळसूत्रे, असा सुमारे ६५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
दिनांक १४ सप्टेंबर रोजी सकाळी सुमारे ११.१५ वाजता शिवनेरी कॉलनी, विजयनगर, गारखेडा परिसरातील मंगल चव्हाण या कुटुंबासह गणपतीची मूर्ती व पूजेसाठी साहित्य खरेदी करण्याकरिता उदगीर हॉस्पिटलसमोरील गजानन महाराज मंदिर परिसरात गेल्या होत्या. यावेळी गर्दीत दोन अनोळखी महिलांनी त्यांच्या पुढे व मागे राहून धक्का देत त्यांच्या गळ्यातील सुमारे ३५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र कापून चोरून नेले.
दरम्यान, त्याच परिसरात गणेशमूर्ती खरेदी करत असलेल्या संगीता सपकाळ यांच्या गळ्यातील सुमारे ३० हजार रुपये किमतीचे तीन ग्रॅम वजनाचे सोन्याचे मणी मंगळसूत्रही गर्दीचा फायदा घेत चोरी झाल्याचे समोर आले.
या प्रकरणी जवाहरनगर पोलीस ठाण्यात गु.र.नं. ४०८/२०२६, कलम ३०३(२), ३(५) भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
CCTV आणि खबऱ्यांच्या माहितीवरून टोळीचा शोध
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली जवाहरनगर पोलिसांनी मंदिर परिसरातील CCTV फुटेज तपासले. तसेच गुप्त बातमीदारांकडून माहिती घेत असताना संशयित महिला गजानन महाराज मंदिर परिसरातील बाजारपेठेत फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी महिला पोलीस कर्मचाऱ्यांच्या मदतीने तीन संशयित महिलांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी आपली नावे पुजा राहुल पवार (वय २१), सुनिता दिलीप काळे (वय ३५) आणि मुस्कान राघव पवार (वय ३५) अशी सांगितली. तिघीही सध्या सलबतपूर, ता. नेवासा, जि. अहिल्यानगर परिसरात राहत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांनी केलेल्या चौकशीत संशयित महिलांनी मंगळसूत्र चोरी केल्याची कबुली दिल्याचे प्रेसनोटमध्ये नमूद आहे. त्यानंतर त्यांना पुढील कायदेशीर कारवाईसाठी जवाहरनगर पोलीस ठाण्यात आणण्यात आले. त्यांच्या ताब्यातून चोरीस गेलेला सोन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या कारवाईमुळे गजानन महाराज मंदिर परिसरातील गर्दीचा फायदा घेत महिलांच्या दागिन्यांची चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
कारवाई : पोलीस आयुक्त प्रवीण पवार, पोलीस उपआयुक्त परिमंडळ-२ रत्नाकर नवले, सहाय्यक पोलीस आयुक्त मनीष कल्याणकर आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी मपोह/९३७ धुळे, मउपनि. लाटे, स.फौ. पोटे, पोह. रावते, पोअं. मारोती गोरे, राजेंद्र शिंदे, कपिल खिल्लारे तसेच प्रशिक्षणार्थी महिला पोलीस अंमलदार प्रियंका शिरसाठ, पुनम साळवे आणि पूजा लेनेकर यांनी ही कारवाई केली.
महाराष्ट्र वाणी | सत्यासाठी निर्भीड | जनतेसाठी समर्पित