पाणीचोरीविरोधात मनपाचा दणका! नागसेन कॉलनी परिसरातील ३३ नळ जोडण्या खंडित

पाणीचोरीविरोधात मनपाचा दणका! नागसेन कॉलनी परिसरातील ३३ नळ जोडण्या खंडित
पाणीचोरीविरोधात मनपाचा दणका! नागसेन कॉलनी परिसरातील ३३ नळ जोडण्या खंडित

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि ६ :- शहरातील पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासोबतच पाण्याचा अनधिकृत उपसा आणि अपव्यय रोखण्यासाठी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने कारवाईची मोहीम अधिक तीव्र केली आहे. मनपा आयुक्त अमोल येडगे यांच्या आदेशानुसार विशेष शोध पथकाने नागसेन कॉलनी, रोशन गेट आणि आसिफिया कॉलनी परिसरात कारवाई करत तब्बल ३३ अनधिकृत नळ जोडण्या खंडित केल्या.

नागसेन कॉलनी तसेच रोशन गेटच्या मागील बाजूस असलेल्या आसिफिया कॉलनी परिसरात २०० मिमी व्यासाच्या मुख्य जलवाहिनीवरून अनधिकृतपणे पाणी घेतले जात असल्याचे मनपाच्या पथकाच्या निदर्शनास आले. या बेकायदेशीर जोडण्यांमुळे मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती होत असून रस्त्यावर पाणी साचत असल्याने नागरिकांनाही त्रास सहन करावा लागत होता.

ही बाब लक्षात आल्यानंतर मनपाच्या पथकाने तातडीने कारवाई करत संबंधित ३३ अनधिकृत जोडण्या जागेवरच तोडल्या. अभियंता रोहित इंगळे, अनधिकृत नळ शोध पथक तसेच माजी सैनिकांचा समावेश असलेल्या नागरी मित्र पथकाने संयुक्तपणे ही मोहीम राबवली.

मनपा अतिरिक्त आयुक्त-२ कल्पिता पिंपळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. कार्यकारी अभियंता दत्तात्रय गायकवाड, उपअभियंता मिलिंद भामरे, उपअभियंता आनंद राजपूत, कनिष्ठ अभियंता सचिन वेलदोडे, अक्षय डुकले यांच्यासह स्वप्निल पाईकडे, तमिज पठाण, तुषार पोटपिल्लेवर, ऋतिक वाघमारे यांनी कारवाईत सहभाग घेतला.

तसेच नागरी सहाय्यक पथकातील स्वर्णसिंग परदेशी, देविदास सुसर, जनार्दन सांगळे, बालाजी साबळे आणि भोसले यांनीही मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवला.

अनधिकृत नळ जोडण्यांवर कारवाई सुरूच राहणार

शहरातील नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देताना त्याचा अपव्यय आणि अनधिकृत वापर रोखणे हे मनपाचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. अनधिकृत नळ जोडण्या तसेच पाण्याचा बेकायदेशीर उपसा कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा मनपा प्रशासनाने दिला आहे.

आगामी काळात अशा अनधिकृत जोडण्या शोधण्यासाठी शहरातील विविध भागांत तपासणी आणि कारवाईची मोहीम आणखी तीव्र करण्यात येणार असल्याचे मनपाने स्पष्ट केले आहे.

अखलाख देशमुख — महाराष्ट्र वाणी न्यूज