पाणी वाया घालवाल तर खिसा होणार रिकामा! नळाला तोटी नाही, रस्त्यावर पाणी सोडले तर मनपाचा दणका; आरेफ व हिलाल कॉलनीत दोघांवर दंड

पाणी वाया घालवाल तर खिसा होणार रिकामा! नळाला तोटी नाही, रस्त्यावर पाणी सोडले तर मनपाचा दणका; आरेफ व हिलाल कॉलनीत दोघांवर दंड
पाणी वाया घालवाल तर खिसा होणार रिकामा! नळाला तोटी नाही, रस्त्यावर पाणी सोडले तर मनपाचा दणका; आरेफ व हिलाल कॉलनीत दोघांवर दंड

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि ६ :- दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शहरातील पाण्याचा अपव्यय करणाऱ्यांविरोधात छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने आता कडक भूमिका घेतली आहे. नळाचे पाणी रस्त्यावर सोडणे, नळाला तोटी न बसवणे किंवा पाण्याची गळती रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना न करणे नागरिकांना चांगलेच महागात पडणार आहे. पाणी वाया घालवल्यास थेट दंडात्मक कारवाईचा इशारा मनपाने दिला आहे.

मनपा आयुक्त अमोल येडगे यांनी नागरिकांना पाणी बचतीचे आवाहन केले असून, पाण्याचा प्रत्येक थेंब जपून वापरण्याचे निर्देश दिले आहेत. पाणी भरल्यानंतर तातडीने नळ बंद करावा, पाणी रस्त्यावर अथवा नाल्यात वाहून जाणार नाही याची दक्षता घ्यावी आणि प्रत्येक नळाला योग्य तोटी बसवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, घरगुती नळ जोडणी, नळाच्या तोट्या तसेच अंतर्गत जलवाहिनीतील गळती आणि आवश्यक दुरुस्तीची कामे १५ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करून घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यानंतर पाण्याचा अपव्यय किंवा गळती आढळल्यास संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे.

पहिल्यांदा ५ हजार, दुसऱ्यांदा १० हजार; तिसऱ्यांदा थेट २५ हजारांचा दंड!

मनपाने पाणी अपव्यय करणाऱ्यांसाठी दंडाची तरतूद स्पष्ट केली आहे. पहिल्यांदा ५ हजार रुपये, दुसऱ्यांदा १० हजार रुपये आणि तिसऱ्यांदा तब्बल २५ हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे. वारंवार नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात फौजदारी गुन्हाही दाखल केला जाणार आहे.

आरेफ व हिलाल कॉलनीत मनपाचा दणका

या कारवाईचा धडाका मनपाच्या पाणीपुरवठा विभागाने आरेफ कॉलनी आणि हिलाल कॉलनी परिसरात सुरू केला. गस्तीदरम्यान नळाचे पाणी थेट रस्त्यावर सोडल्याचे आढळून आल्यानंतर अजहर कादिल यांच्यावर १० हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली.

तसेच नळाला तोटी न बसवता पाणी रस्त्यावर सोडल्याप्रकरणी शेख अतिक यांच्यावर ५ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.

मनपाच्या या कारवाईमुळे शहरातील पाणी वाया घालविणाऱ्या नागरिकांमध्ये आता चांगलाच वचक निर्माण होण्याची शक्यता आहे.

ही कारवाई मनपा आयुक्त अमोल येडगे यांच्या आदेशानुसार, उपअभियंता भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली कनिष्ठ अभियंता सचिन वेलदोडे, लाईनमन सय्यद अबरार, सचिन पवार, स्वच्छता निरीक्षक तसेच नागरी मित्र पथकाच्या कर्मचाऱ्यांनी केली.

नागरिकांनी सावध व्हावे!

दुष्काळसदृश परिस्थितीत पाणीपुरवठ्यावर वाढता ताण लक्षात घेता नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करणे गरजेचे आहे. नळाला तोटी बसवा, गळती तातडीने दुरुस्त करा आणि पाणी रस्त्यावर वाहू देऊ नका; अन्यथा दंडासाठी तयार राहा, असा स्पष्ट संदेश मनपाच्या कारवाईतून देण्यात आला आहे.

अखलाख देशमुख - महाराष्ट्र वाणी न्यूज