दुष्काळ जाहीर करून उपयोग नाही; शेतकऱ्यांच्या खात्यात थेट मदत जमा करा – आदित्य ठाकरे

दुष्काळ जाहीर करून उपयोग नाही; शेतकऱ्यांच्या खात्यात थेट मदत जमा करा – आदित्य ठाकरे
दुष्काळ जाहीर करून उपयोग नाही; शेतकऱ्यांच्या खात्यात थेट मदत जमा करा – आदित्य ठाकरे

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि २७ :- राज्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला असला तरी केवळ शासन निर्णय काढून प्रश्न सुटणार नाही. दुष्काळाचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मदत मिळणे आवश्यक असून, त्यांच्या खात्यात थेट आर्थिक मदत जमा करावी, अशी मागणी शिवसेना नेते तथा युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी केली.

गंगापूर तालुक्यातील भगतवाडी येथे आदित्य ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन दुष्काळी परिस्थितीची पाहणी केली. अपुऱ्या पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, त्याचा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत देण्याबरोबरच ‘नमो शेतकरी’ योजनेपासून वंचित राहिलेल्या पात्र शेतकऱ्यांना लाभ द्यावा, अशी मागणीही ठाकरे यांनी केली. तसेच कर्जमाफीचा लाभ पात्र शेतकऱ्यांना विलंब न करता मिळावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

सरकारकडून दुष्काळग्रस्तांसाठी नेमकी कोणती मदत दिली जाणार आणि ती कधीपर्यंत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणार, याबाबत स्पष्ट माहिती प्रशासनाने जाहीर करावी, असेही त्यांनी म्हटले.

दरम्यान, शिवसेनेच्या माध्यमातून दुष्काळग्रस्त भागात मदत केंद्रे सुरू करून शेतकऱ्यांच्या प्रश्नांचा पाठपुरावा केला जाईल, अशी माहिती आदित्य ठाकरे यांनी दिली.

यावेळी आमदार अंबादास दानवे, जेष्ठ नेते चंद्रकांत खैरे, कैलास पाटील, राहुल पाटील आणि सुभाष पाटील यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

महाराष्ट्र वाणी | सत्यासाठी निर्भीड | जनतेसाठी समर्पित