महाराष्ट्रात सरसकट दुष्काळ जाहीर करा; शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत द्या – खा.डॉ. कल्याण काळे

महाराष्ट्रात सरसकट दुष्काळ जाहीर करा; शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत द्या – खा.डॉ. कल्याण काळे

छत्रपती संभाजीनगर दि २५ :- महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने कोणत्याही अटी-शर्ती न लावता आणि केंद्र सरकारच्या मदतीची प्रतीक्षा न करता तातडीने सरसकट दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी खासदार डॉ. कल्याण काळे यांनी केली आहे.

कर्नाटक सरकारने दुष्काळाच्या परिस्थितीत निर्णय घेतला, तर महाराष्ट्र सरकारला तसा निर्णय घेण्यात अडचण का येत आहे, असा सवाल डॉ. काळे यांनी उपस्थित केला. दुष्काळ जाहीर करण्यासाठी केवळ ५ ऑक्टोबर रोजी मान्सूनचा कालावधी संपण्याची प्रतीक्षा करणे योग्य नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

पावसातील दीर्घ खंड, पिकांचे झालेले नुकसान तसेच त्याचा शेतीवर झालेला परिणाम यांसारख्या विविध बाबींचा विचार करून दुष्काळी परिस्थितीचे मूल्यांकन करण्याची गरज असल्याचे डॉ. काळे यांनी नमूद केले.

सरकारने आता तातडीने निर्णय घेऊन परतीच्या पावसाची प्रतीक्षा न करता दुष्काळ जाहीर करावा आणि शेतकऱ्यांना त्वरित आर्थिक मदत उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. सरकारकडून केवळ आश्वासने दिली जात असून शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मदतीची आवश्यकता असल्याचेही त्यांनी म्हटले.

“शेतकरी जगला तरच महाराष्ट्र जगेल,” असे सांगत डॉ. कल्याण काळे यांनी राज्य सरकारने दुष्काळाच्या प्रश्नावर तातडीने ठोस निर्णय घेण्याचे आवाहन केले.

महाराष्ट्र वाणी

“सत्यासाठी निर्भीड | जनतेसाठी समर्पित”✊📰