पैठण तहसील कार्यालयात तलाठी १ हजार रुपयांची लाच घेताना ACBच्या जाळ्यात
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) वि २५ :- पैठण तालुक्यातील वडवाळी सजा येथील ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) दिलीप उद्धवराव कांबळे (वय ५६) यांना १ हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात पकडले. ही कारवाई शुक्रवार, २५ सप्टेंबर २०२६ रोजी पैठण तहसील कार्यालयात करण्यात आली.
ACBच्या माहितीनुसार, तक्रारदार हे ६८ वर्षीय शेतकरी असून नायगाव शिवारातील त्यांच्या मालकीच्या गट क्रमांक ५६ मधील शेतीच्या वहिवाटीच्या ४ मीटर रस्त्याची नोंद सातबारा उताऱ्यावर घेण्यासाठी त्यांनी तलाठ्याकडे अर्ज केला होता. ही नोंद करण्यासाठी तलाठी दिलीप कांबळे यांनी तक्रारदाराकडे लाचेची मागणी केल्याची तक्रार ACBकडे करण्यात आली.
तक्रारीच्या अनुषंगाने २३ सप्टेंबर २०२६ रोजी लाच मागणीची पडताळणी करण्यात आली. त्यावेळी तडजोडीनंतर १ हजार रुपये स्वीकारण्याचे पंचांसमक्ष निश्चित झाल्याचे ACBच्या तपासात निष्पन्न झाले.
त्यानंतर २५ सप्टेंबर रोजी तक्रारदार पैठण तहसील कार्यालयात गेले. तेथे तलाठी कांबळे यांनी पंचांसमक्ष १ हजार रुपयांची लाच स्वीकारल्यानंतर ACBच्या पथकाने त्यांना ताब्यात घेतले.
या प्रकरणी पैठण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, गुन्हा दाखल झाल्यानंतर अटकेची नोंद करण्यात येणार असल्याचे ACBने प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे.
या कारवाईत पोलीस उपअधीक्षक विशाल बहात्तरे हे सापळा अधिकारी, तर पोलीस निरीक्षक अमोल सोनवणे हे तपास अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. पर्यवेक्षणाची जबाबदारी पोलीस उपअधीक्षक प्रशांत पवार यांच्याकडे होती.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे नागरिकांना आवाहन : कोणत्याही लोकसेवकाने शासकीय कामासाठी लाच मागितल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन विभागाने केले आहे.
महाराष्ट्र वाणी | सत्यासाठी निर्भीड | जनतेसाठी