वरखेडी-भोकरीच्या लेकीने गाठले वैद्यकीय क्षेत्रातील शिखर; शबनम शेख अल्ताफचे MBBS पूर्ण, काकर परिवाराचा गौरव
पाचोरा (प्रतिनिधी) डि ५ :- पाचोरा तालुक्यातील वरखेडी-भोकरी (जि. जळगाव) परिसराच्या शिरपेचात वैद्यकीय क्षेत्रातील आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. या परिसरातील रहिवासी आणि प्रसिद्ध वैद्यकीय व्यावसायिक डॉ. अश्फाक काकर यांच्या कुटुंबातील शबनम शेख अल्ताफ हिने वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून MBBS पदवी संपादन केली आहे. तिच्या या उल्लेखनीय यशामुळे काकर परिवारासह वरखेडी-भोकरी परिसराचे नाव अभिमानाने उंचावले आहे.
शबनम शेख अल्ताफ ही दिवंगत डॉ. अल्ताफ शेख यांची कन्या आहे. वैद्यकीय क्षेत्राची कौटुंबिक परंपरा आणि शिक्षणाची प्रेरणा पुढे नेत तिने वैद्यकीय शिक्षण यशस्वीपणे पूर्ण केले. ग्रामीण भागातून आलेल्या विद्यार्थिनीने वैद्यकीय क्षेत्रात मिळवलेले हे यश विशेष कौतुकास्पद मानले जात आहे.
शबनमच्या यशामागे तिची मेहनत, सातत्य, जिद्द आणि कुटुंबीयांचे मार्गदर्शन यांचा महत्त्वाचा वाटा असल्याचे सांगितले जात आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत ध्येय निश्चित करून प्रयत्न केल्यास ग्रामीण भागातील विद्यार्थीही वैद्यकीय शिक्षणासारख्या आव्हानात्मक क्षेत्रात यश मिळवू शकतात, हे तिच्या कामगिरीने अधोरेखित केले आहे.
शबनम शेख अल्ताफ हिच्या या यशाबद्दल काकर परिवारावर विविध स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. नातेवाईक, मित्रपरिवार, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील व्यक्ती तसेच परिसरातील नागरिकांकडून तिचे कौतुक केले जात आहे.
विशेष म्हणजे, ग्रामीण भागातील मुलींनी शिक्षणाच्या माध्यमातून आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी पुढे यावे, यासाठी शबनमचे यश प्रेरणादायी ठरणार आहे. वैद्यकीय क्षेत्रात पुढील काळातही उल्लेखनीय कार्य करून समाजाची सेवा करण्याची संधी तिच्यासमोर निर्माण झाली आहे.
वरखेडी-भोकरीच्या मातीतून वैद्यकीय क्षेत्रात उंच भरारी घेणाऱ्या शबनम शेख अल्ताफ हिच्या या यशाने परिसरातील विद्यार्थी आणि पालकांसमोर शिक्षणातून प्रगतीचा नवा आदर्श निर्माण केला आहे.
अखलाख देशमुख - महाराष्ट्र वाणी न्यूज