बंब-चव्हाणांचा संघर्ष थांबला? उमेदवारीच्या निमित्ताने दोन्ही नेते एकत्र; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण!

बंब-चव्हाणांचा संघर्ष थांबला? उमेदवारीच्या निमित्ताने दोन्ही नेते एकत्र; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण!

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि ५ :- मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून आमदार प्रशांत बंब आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सतीश चव्हाण यांच्यात रंगलेला राजकीय संघर्ष आता नव्या वळणावर आल्याचे चित्र दिसत आहे. शिक्षकांच्या मुख्यालयी उपस्थितीपासून वेतनवाढीच्या प्रश्नापर्यंत दोन्ही नेत्यांनी एकमेकांच्या भूमिकांवर जोरदार टीका केली होती. मात्र, आज उमेदवारी अर्जाच्या प्रक्रियेदरम्यान दोन्ही नेते एकाच ठिकाणी दिसल्याने राजकीय चर्चांना चांगलेच उधाण आले आहे.

आमदार प्रशांत बंब यांनी शिक्षक मुख्यालयी राहत नसल्याचा मुद्दा आक्रमकपणे उपस्थित करत पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या अस्तित्वाच्या गरजेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यांच्या या भूमिकेला आमदार सतीश चव्हाण यांनी विरोध दर्शविला होता. त्यानंतर १,०८६ शिक्षकांच्या वेतनवाढीचा मुद्दा पुढे आल्याने दोन्ही नेत्यांमधील आरोप-प्रत्यारोप अधिक तीव्र झाले.

या पार्श्वभूमीवर सतीश चव्हाण यांनी मराठवाडा पदवीधर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात केली. याच वेळी आमदार प्रशांत बंब यांची झालेली उपस्थिती विशेष चर्चेचा विषय ठरली. सतीश चव्हाण यांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर झाल्याचे वृत्तही राजकीय वर्तुळात चर्चेत आहे.

काही दिवसांपूर्वी एकमेकांवर टीकेची झोड उठवणारे बंब आणि चव्हाण आता एकाच व्यासपीठावर दिसल्याने नेमके राजकीय समीकरण काय? असा सवाल उपस्थित होत आहे. या भेटीमागे कोणती राजकीय रणनीती आहे का, भविष्यातील समीकरणांची ही नांदी आहे का किंवा ही केवळ उमेदवारी प्रक्रियेपुरती उपस्थिती आहे, याबाबत सध्या विविध तर्क-वितर्क सुरू आहेत.

मात्र, या उपस्थितीवरून कोणताही राजकीय निष्कर्ष काढण्यापूर्वी दोन्ही नेत्यांची अधिकृत भूमिका स्पष्ट होणे महत्त्वाचे ठरणार आहे. त्यामुळे बंब-चव्हाण यांच्यातील मागील संघर्ष आणि आता उमेदवारीच्या निमित्ताने दिसलेले हे नवे चित्र आगामी निवडणुकीत कोणते वळण घेते, याकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख ६ ऑक्टोबर २०२६ आहे. ७ ऑक्टोबरला अर्जांची छाननी, तर ९ ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी मागे घेण्याची मुदत आहे. त्यानंतर २३ ऑक्टोबर २०२६ रोजी मतदान होणार आहे.

त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर बंब आणि चव्हाण यांचे एकत्र दिसणे ही सध्या मराठवाड्याच्या राजकारणातील लक्षवेधी घडामोड ठरली असून, या दृश्यामागील राजकीय संदेश काय आहे, याची उत्सुकता निर्माण झाली आहे.

अखलाख देशमुख - महाराष्ट्र वाणी न्यूज