‘बँकेचे खरे मालक सभासदच’; मनमानी कारभार करू नका, अब्दुल सत्तारांचा MDंना इशारा
औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभेत सभासदांच्या हक्कांवरून सत्तार आक्रमक
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि २७ :- दिनांक 26 सप्टेंबर रोजी औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. या सभेत आमदार अब्दुल सत्तार यांनी सभासदांच्या हक्कांचा मुद्दा उपस्थित करत बँक व्यवस्थापनाला स्पष्ट शब्दांत सुनावले.
बँकेच्या कारभाराबाबत बोलताना सत्तार यांनी सांगितले की, बँकेचे अस्तित्व आणि तिची आर्थिक ताकद ही सभासदांमुळेच आहे. त्यामुळे सभासद हेच बँकेचे खरे मालक आहेत. त्यांच्या हिताला आणि अधिकारांना प्राधान्य मिळाले पाहिजे.
बँकेचे व्यवस्थापकीय संचालक (MD) आणि अधिकाऱ्यांनी कोणताही निर्णय घेताना मनमानी पद्धतीने कारभार करू नये, असे सत्तार यांनी स्पष्ट केले. सभासदांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करून किंवा त्यांच्या हक्कांवर गदा आणून निर्णय घेतले जात असतील, तर ते योग्य ठरणार नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली.
सभासदांनी विश्वासाने बँकेत पैसा ठेवला आहे. त्यामुळे त्यांच्या हिताचे रक्षण करणे ही बँक व्यवस्थापनाची जबाबदारी आहे, असेही त्यांनी अधोरेखित केले.
सभासदांचे हक्क आणि हित डावलले जात असल्यास ते खपवून घेतले जाणार नाही, असा स्पष्ट इशारा आमदार अब्दुल सत्तार यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेत दिला.
या भूमिकेमुळे बँकेच्या कारभारात सभासदांच्या हिताला आणि त्यांच्या अधिकारांना किती महत्त्व दिले जाते, यावर सभेत चर्चा झाली.