पदवीधर मतदारसंघाच्या रणधुमाळीत राष्ट्रवादीचा शड्डू! डॉ. प्रतापसिंह पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल

पदवीधर मतदारसंघाच्या रणधुमाळीत राष्ट्रवादीचा शड्डू! डॉ. प्रतापसिंह पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल
पदवीधर मतदारसंघाच्या रणधुमाळीत राष्ट्रवादीचा शड्डू! डॉ. प्रतापसिंह पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि ६ :- औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असून, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी–शरदचंद्र पवार पक्षाचे धाराशिव जिल्हाध्यक्ष डॉ. प्रतापसिंह वेदप्रकाश पाटील यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांच्या उमेदवारीमुळे पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीची रंगत आणखी वाढली आहे.

उमेदवारी अर्ज दाखल करताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी–शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री राजेश टोपे, पक्षाच्या राष्ट्रीय महिला अध्यक्षा तथा माजी खासदार फौजिया खान, युवक प्रदेशाध्यक्ष व पक्षाचे प्रवक्ते मेहबूब शेख, राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सक्षणा सलगर, पदवीधर विभागाचे प्रदेशाध्यक्ष डॉ. नरेंद्र काळे, माजी आमदार पृथ्वीराज साठे तसेच अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे महाराष्ट्र प्रदेश सचिव डॉ. अब्दुल बाकी यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी–शरदचंद्र पवार पक्ष आणि काँग्रेस पक्षाचे मराठवाड्यातील विविध जिल्ह्यांतील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच पदवीधर प्रतिनिधी, शिक्षक, प्राध्यापक, युवक-युवती पदाधिकारी आणि समर्थकांनीही मोठी गर्दी केली.

पदवीधरांचे प्रश्न, शिक्षण-रोजगाराचे मुद्दे आणि युवकांच्या अपेक्षांना केंद्रस्थानी ठेवत डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी निवडणुकीच्या मैदानात प्रवेश केला आहे. त्यामुळे औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघातील आगामी राजकीय समीकरणांकडे आता संपूर्ण मराठवाड्याचे लक्ष लागले आहे.

अखलाख देशमुख - महाराष्ट्र वाणी न्यूज