वाळूजमधील सोडेक्सो कॅन्टीनचा अन्न परवाना निलंबित; तपासणीत ४४ टक्के गुण, गंभीर अनियमितता उघड
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि २ :- ‘Safe Food Safe Maharashtra’ मोहिमेअंतर्गत अन्न व औषध प्रशासनाने (FDA) एमआयडीसी वाळूज परिसरातील सोडेक्सो इंडिया सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड (C/O गुडईयर साऊथ एशिया टायर्स प्रायव्हेट लिमिटेड) या कंपनीच्या कॅन्टीनवर कठोर कारवाई केली आहे. तपासणीत गंभीर त्रुटी आढळून आल्याने संबंधित आस्थापनेचा अन्न व्यवसाय परवाना तात्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आला आहे.
आमदार प्रशांत बंब यांनी या कॅन्टीनमधील कथित अनियमिततांबाबत तपासणी करून कारवाई करण्याची मागणी करणारे पत्र अन्न प्रशासनाला दिले होते. त्यानंतर अन्न प्रशासनाने तपासणी करून ही कारवाई केली.
अन्न सुरक्षा अधिकारी प्रज्ञा प्रमोद सुरसे यांनी ३० सप्टेंबर २०२६ रोजी कॅन्टीनची अचानक तपासणी केली. तपासणीदरम्यान १०६ पैकी केवळ ४४ गुण म्हणजेच ४२ टक्के गुण मिळाले. तपासणीचा अंतिम निष्कर्ष ‘नॉन-कम्प्लायन्स’ म्हणजेच नियमांचे पालन न करणारा असा नोंदवण्यात आला.
तपासणीत कोणत्या त्रुटी आढळल्या?
अन्न प्रशासनाच्या तपासणी अहवालानुसार कॅन्टीनमध्ये गरम व थंड अन्नासाठी आवश्यक तापमान नियंत्रणाची व्यवस्था उपलब्ध नव्हती. अन्न तयार करण्याची जागा, भाजीपाला कापण्याचे क्षेत्र आणि जेवणाचे टेबल अस्वच्छ अवस्थेत आढळले.
कॅन्टीनच्या जमिनीवरील काही फरशा तुटलेल्या होत्या. योग्य उतार नसल्यामुळे पाणी साचत होते, तर सांडपाणी वाहून नेणारे नालेही अस्वच्छ आढळले.
अन्न साठवण्यासाठी वापरला जाणारा फ्रिज गंजलेला असून त्याचा दरवाजा तुटलेल्या अवस्थेत असल्याचे तपासणीत निदर्शनास आले. तसेच कच्चे आणि शिजवलेले अन्न, तसेच शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थ वेगवेगळे न ठेवल्याने क्रॉस-कंटॅमिनेशनचा धोका निर्माण झाल्याचे प्रशासनाने नमूद केले आहे.
याशिवाय परिसरात कोळ्याची जाळी आढळली. कीड नियंत्रणाबाबत आवश्यक नोंदी उपलब्ध नव्हत्या. स्वयंपाकासाठी वापरल्या जाणाऱ्या तेलाची नियमित गुणवत्ता तपासणी केली जात नसल्याचेही आढळले. अन्न हाताळणाऱ्या कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी आणि लसीकरणासंबंधी आवश्यक प्रमाणपत्रेही नियमांनुसार उपलब्ध नसल्याचे तपासणी अहवालात नमूद आहे.
अन्न व्यवसाय तात्काळ बंद करण्याचे आदेश
या त्रुटींमुळे अन्नाची सुरक्षितता आणि ग्राहक व कर्मचाऱ्यांच्या आरोग्याबाबत धोका निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, २००६ मधील कलम ३२(३) अंतर्गत परवाना निलंबित करण्याचा आदेश देण्यात आला आहे.
सहाय्यक आयुक्त (अन्न) तथा पदनिर्देशित अधिकारी द. वि. पाटील यांनी हा आदेश जारी केला आहे. आदेशानुसार संबंधित आस्थापनेला अन्न तयार करणे, प्रक्रिया करणे, विक्री, वितरण तसेच भोजन पुरवठ्यासह कॅटरिंगशी संबंधित सर्व व्यवसायिक उपक्रम तात्काळ बंद करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
दरम्यान, आस्थापनेने तपासणीमध्ये नमूद करण्यात आलेल्या सर्व त्रुटी दूर करून त्याबाबतचा अनुपालन अहवाल आवश्यक पुराव्यांसह अन्न प्रशासनाकडे सादर करणे आवश्यक आहे. त्यानंतर फेरतपासणी करण्यात येईल आणि त्याच्या आधारे परवाना पूर्ववत करण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे, अशी माहिती अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त श्रीकांत करकळे यांनी दिली.
अखलाख देशमुख - महाराष्ट्र वाणी न्यूज