कार्यालयासाठी आक्रमक, जनतेच्या प्रश्नांवर शांत? MIMच्या भूमिकेवर SDPIचा सवाल
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि १ : महानगरपालिकेत बुधवार, ३० सप्टेंबर रोजी MIMच्या विरोधी पक्षनेते आणि नगरसेवकांनी गटनेत्याच्या कार्यालयाच्या मुद्द्यावरून जोरदार गदारोळ केल्याचा आरोप SDPIचे औरंगाबाद जिल्हाध्यक्ष इंजिनिअर शाह समीर यांनी केला आहे. मात्र, हा आक्रमकपणा जनतेच्या मूलभूत प्रश्नांसाठी का दिसत नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
महानगरपालिकेच्या कामकाजात लोकप्रतिनिधींची भूमिका ही नागरिकांच्या समस्या प्रशासनासमोर मांडून त्यावर तोडगा काढण्यासाठी महत्त्वाची असते. शहरातील पाणीपुरवठा, रस्त्यांची दुरवस्था, कचरा व स्वच्छता, वाहतूक कोंडी, नाले-सांडपाणी, अतिक्रमणे तसेच इतर नागरी सुविधांबाबत नागरिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे शाह समीर यांनी म्हटले.
गटनेत्याच्या कार्यालयाच्या प्रश्नावर ज्या पद्धतीने आक्रमक भूमिका घेतली गेली, त्याच पद्धतीने शहरातील सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठीही आवाज उठवला पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. “जनतेने जनप्रतिनिधींना निवडून दिले आहे ते जनतेच्या प्रश्नांसाठी आवाज उठवण्यासाठी; केवळ स्वतःच्या हिताच्या प्रश्नांसाठी नव्हे,” असा टोला शाह समीर यांनी लगावला.
महानगरपालिकेतील सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील सर्वच लोकप्रतिनिधींनी नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांना प्राधान्य द्यावे, तसेच सभागृहातील आक्रमकता ही जनहिताच्या प्रश्नांवर दिसून यावी, अशी मागणी त्यांनी केली.
दरम्यान, गटनेत्याच्या कार्यालयाचा प्रश्न आणि त्यावरून झालेल्या मनपा सभागृहातील गदारोळामुळे राजकीय वातावरण पुन्हा चर्चेत आले आहे. मात्र, या वादाच्या पार्श्वभूमीवर “शहरातील पाणी, रस्ते, स्वच्छता आणि वाहतुकीच्या प्रश्नांवरही अशीच ताकदवान भूमिका कधी घेतली जाणार?” हा प्रश्न आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
अखलाख देशमुख - महाराष्ट्र वाणी न्यूज