नशामुक्त युवा आरोग्य पदयात्रेतून व्यसनमुक्तीचा संदेश; रविवारी बीबी का मकबरा ते विद्यापीठ प्रवेशद्वार

नशामुक्त युवा आरोग्य पदयात्रेतून व्यसनमुक्तीचा संदेश; रविवारी बीबी का मकबरा ते विद्यापीठ प्रवेशद्वार

छत्रपती संभाजीनगर, दि. ३ : ‘विकसित भारतासाठी नशामुक्त युवा’ अभियानांतर्गत रविवार, ४ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ वाजता छत्रपती संभाजीनगर येथे ‘नशामुक्त युवा आरोग्य पदयात्रे’चे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. हे या पदयात्रेत सहभागी होणार आहेत.

भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयांतर्गत मेरा युवा भारत (MY Bharat), छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीने या पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. युवकांमध्ये अमली पदार्थ आणि विविध व्यसनांच्या दुष्परिणामांविषयी जनजागृती करणे, निरोगी जीवनशैली, शारीरिक तंदुरुस्ती, मानसिक स्वास्थ्य आणि सकारात्मक सामाजिक सहभागाला प्रोत्साहन देणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.

या पदयात्रेत विविध शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थी व युवक, मेरा युवा भारतचे युवा स्वयंसेवक, NSS, NCC, युवा संघटना तसेच समाजातील विविध घटक सहभागी होणार आहेत. युवकांनी स्वतः व्यसनांपासून दूर राहण्यासोबतच मित्र, कुटुंबीय आणि समाजालाही व्यसनमुक्त जीवनशैलीसाठी प्रेरित करावे, असा संदेश या माध्यमातून दिला जाणार आहे.

‘पुढे पाऊल टाका, व्यसनमुक्त रहा’ या संदेशासह आयोजित करण्यात आलेल्या या पदयात्रेत योग, क्रीडा, व्यायाम, प्रतिबंधात्मक आरोग्य, जीवनकौशल्ये आणि सामाजिक सहभागाचे महत्त्व अधोरेखित केले जाणार आहे.

ही मोहीम ‘१०० आठवडे नशामुक्त युवा अभियान’ या देशव्यापी उपक्रमाच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आली आहे. युवकांच्या नेतृत्वातून जनजागृती, आरोग्यविषयक उपक्रम, प्रतिज्ञा अभियान, पथनाट्य, चर्चा आणि समाज सहभागाला या अभियानात प्रोत्साहन दिले जात आहे.

पदयात्रेचा मार्ग : बीबी का मकबरा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ प्रवेशद्वार.

दिनांक : रविवार, ४ ऑक्टोबर २०२६

वेळ : सकाळी ८ वाजता

स्थळ : छत्रपती संभाजीनगर

संदेश : ‘निरोगी आणि व्यसनमुक्त युवा ही विकसित भारताची भक्कम पायाभरणी आहे.’

अखलाख देशमुख - महाराष्ट्र

वाणी न्यूज