“उद्या जिल्ह्यात ‘एक दिन, एक घंटा, एक साथ’; सर्व ग्रामपंचायतींमध्ये महाश्रमदान”

“उद्या जिल्ह्यात ‘एक दिन, एक घंटा, एक साथ’; सर्व ग्रामपंचायतींमध्ये महाश्रमदान”

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि ३० :- ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानांतर्गत गुरुवार, १ ऑक्टोबर रोजी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये ‘एक दिन, एक घंटा, एक साथ’ हा विशेष स्वच्छता उपक्रम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत जिल्हा परिषदेच्या सर्व विभागप्रमुखांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून सहभाग नोंदवावा, अशा सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू पी. एम. यांनी दिल्या आहेत.

या उपक्रमाच्या माध्यमातून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर सार्वजनिक श्रमदान करण्यात येणार आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीने या अभियानात सक्रिय सहभाग घेणे अपेक्षित असून, संबंधित गटविकास अधिकाऱ्यांकडून ग्रामपंचायतींच्या सहभागाचा आढावा घेतला जाणार आहे.

गावातील सर्वांगीण स्वच्छतेसोबतच सार्वजनिक ठिकाणी साचलेले कचऱ्याचे ढिगारे हटविण्यावर विशेष भर देण्यात येणार आहे. स्वच्छता मोहिमेपूर्वी आणि मोहिमेनंतरचे छायाचित्रे संबंधित ग्रुपवर शेअर करण्याच्या सूचनाही ग्रामविकास अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.

या वर्षीच्या उपक्रमात ‘Waste to Wealth’ (कचऱ्यातून संपत्ती) आणि ‘Waste to Art’ (कचऱ्यातून कलाकृती) या संकल्पनांवर आधारित विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. कचऱ्याचा योग्य वापर करून त्यातून उपयुक्त वस्तू तसेच कलाकृती तयार करण्याचा संदेश या माध्यमातून देण्यात येणार आहे.

ग्रामपंचायतींचे सरपंच, पदाधिकारी आणि ग्रामविकास अधिकाऱ्यांनी स्थानिक संस्था, महिला बचत गट, युवक, प्रतिष्ठित नागरिक तसेच नागरिकांना या महाश्रमदानात सहभागी करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू पी. एम., अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) साहेबराव चव्हाण यांनी केले आहे.

अखलाख देशमुख - महाराष्ट्र वाणी न्यूज