दुष्काळग्रस्त मराठवाड्यात विद्यार्थ्यांचे १०० टक्के शुल्क माफ करा; राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसची मागणी

दुष्काळग्रस्त मराठवाड्यात विद्यार्थ्यांचे १०० टक्के शुल्क माफ करा; राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसची मागणी
दुष्काळग्रस्त मराठवाड्यात विद्यार्थ्यांचे १०० टक्के शुल्क माफ करा; राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसची मागणी

महाराष्ट्र वाणी

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि २२ :- मराठवाड्यात निर्माण झालेल्या दुष्काळजन्य परिस्थितीचा विद्यार्थ्यांच्या शिक्षणावरही आर्थिक परिणाम होत असल्याने चालू शैक्षणिक वर्षातील विद्यार्थ्यांचे १०० टक्के शैक्षणिक शुल्क माफ करावे, अशी मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे.

याबाबत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरूंकडे निवेदन सादर केले. दुष्काळामुळे शेतकरी, शेतमजूर तसेच सर्वसामान्य कुटुंबांवर आर्थिक संकट ओढवले आहे. या परिस्थितीचा थेट परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या खर्चावर होत असून अनेक कुटुंबांसमोर शिक्षणाचा खर्च भागविण्याचे आव्हान निर्माण झाले आहे.

विद्यार्थ्यांचे शिक्षण आर्थिक अडचणींमुळे थांबू नये, यासाठी विद्यापीठाने परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने १०० टक्के शुल्कमाफीचा निर्णय घ्यावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.

दरम्यान, ही मागणी मान्य न झाल्यास विद्यार्थ्यांना सोबत घेऊन लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने दिला आहे.

यावेळी प्रदेशाध्यक्ष सुशील बोर्डे, प्रदेश सचिव प्रकाश इंगळे, शहराध्यक्ष योगेश घुगे, विद्यापीठ अध्यक्ष दिग्विजय शिंदे, आनंद मगरे, पंकज पिसे, आदित्य कुलकर्णी, सिद्धार्थ गुटीकर, नमित कदम, ऋतिक लोहे, सुरेश दाभाडे यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.