सणासुदीआधी FDA ची मोठी कारवाई; छत्रपती संभाजीनगरात ३,६९१ किलो संशयास्पद मिठाई-खवा जप्त
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि २१ :- सणासुदीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अन्न व औषध प्रशासनाने (FDA) शहरात मोठी कारवाई केली. शाहनूरमियाँ दर्गा चौक परिसरातील डी-मार्टजवळ दोन ट्रॅव्हल्स बसची तपासणी करत तब्बल ३,६९१ किलो संशयास्पद मिठाई व खवा सदृश अन्नपदार्थांचा साठा जप्त करण्यात आला.
अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने केलेल्या कारवाईत नीलकंठ ट्रॅव्हल्समधून २,०७९ किलो, तर वीर ट्रॅव्हल्समधून १,६१२ किलो संशयास्पद अन्नसाठा आढळून आला. जप्त करण्यात आलेल्या मालाची एकूण अंदाजे किंमत ५ लाख ९४ हजार ७३६ रुपये असल्याची माहिती आहे.
कारवाईदरम्यान संबंधित अन्नपदार्थांचे नमुने पुढील तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. प्रयोगशाळेतील तपासणीचा अहवाल प्राप्त होईपर्यंत उर्वरित अन्नसाठा उणे १० अंश सेल्सिअस तापमानात सीलबंद करून ठेवण्यात आला आहे.
या नमुन्यांच्या तपासणी अहवालानंतर अन्नपदार्थांमध्ये नियमबाह्य अथवा आरोग्यास घातक घटक आढळल्यास संबंधितांवर अन्न सुरक्षा व मानके कायद्यानुसार पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
सणासुदीच्या काळात मिठाई आणि दुग्धजन्य पदार्थांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते. त्यामुळे अशा पदार्थांच्या वाहतूक व विक्रीवर अन्न व औषध प्रशासनाकडून विशेष लक्ष ठेवले जात आहे.
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) | महाराष्ट्र वाणी