आमदार संजना जाधव यांच्या जिल्हा मध्यवर्ती बँकेतील संचालकपदाला आव्हान; नितीन पाटील यांची याचिका
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि २१ :- कन्नड येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत संचालक म्हणून निवड झालेल्या आमदार संजना जाधव यांच्या संचालकपदाच्या वैधतेवर माजी आमदार नितीन पाटील यांनी आक्षेप घेतला आहे. यासंदर्भात त्यांनी जिल्हा सहाय्यक निबंधकांकडे महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० मधील कलम ११ अंतर्गत याचिका दाखल केली आहे.
पाटील यांच्या याचिकेनुसार, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक लढविण्यासाठी संबंधित उमेदवाराला किमान तीन वर्षे प्राथमिक विकास सेवा संस्थेचा सभासद अथवा संचालक असणे आवश्यक असल्याचा दावा करण्यात आला आहे.
संजना जाधव यांनी निवडणुकीपूर्वी रिठ्ठी मोहर्डा सहकारी सोसायटीचे सभासदत्व घेतल्याचा आणि हे सभासदत्व नियमबाह्य पद्धतीने घेतल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे. तसेच, कथित बनावट कागदपत्रांच्या आधारे बँकेची निवडणूक लढविल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
या पार्श्वभूमीवर संजना जाधव यांचे संबंधित सहकारी सोसायटीतील सभासदत्व तसेच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालकपद रद्द करण्यात यावे, अशी मागणी नितीन पाटील यांनी केली आहे.
या प्रकरणाची चौकशी आणि सुनावणी करण्यासाठी सहकार अधिकारी एस. आर. कासतोडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आता संबंधित याचिकेवर चौकशीदरम्यान कोणते तथ्य समोर येते आणि सहकार विभागाकडून काय निर्णय घेतला जातो, याकडे लक्ष लागले आहे.
टीप : याचिकेत करण्यात आलेले आरोप हे संबंधित पक्षाचे दावे असून, त्यांची सत्यता चौकशी व संबंधित प्राधिकरणाच्या निर्णयानंतर स्पष्ट होईल.