संशोधक विद्यार्थ्यांचे आंदोलन नवव्या दिवशीही सुरू; मुख्यमंत्री भेटीअभावी नाराजी! मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि. २० :- पीएच.डी. संशोधक विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी छत्रपती संभाजीनगर येथील समाजकल्याण कार्यालयासमोर सुरू असलेले बेमुदत धरणे आंदोलन रविवारी नवव्या दिवशीही सुरू राहिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घडवून आणण्याचे आश्वासन मिळूनही नियोजित भेट न झाल्याने आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली. मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार विद्यार्थ्यांनी व्यक्त केला आहे.
मुख्यमंत्र्यांची भेट मिळावी यासाठी संशोधक विद्यार्थ्यांनी जिल्हा प्रशासन आणि पोलिस प्रशासनाकडे निवेदन दिले होते. १७ सप्टेंबर रोजी संशोधक अरुण मते आणि प्रेम पवार यांना मुख्यमंत्र्यांची भेट घडवून आणण्याच्या प्रयत्नात पोलिसांनी सिडको एमआयडीसी पोलिस ठाण्यात स्थानबद्ध केले होते.
विद्यार्थ्यांच्या म्हणण्यानुसार, पोलिस निरीक्षक अविनाश आगाव यांनी यावेळी भेट न होण्यामागील कारण स्पष्ट केले. मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे यांनी अचानक सकाळी उपोषण सोडून छत्रपती संभाजीनगरकडे रवाना झाल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तातडीने पुढे जावे लागले आणि त्यामुळे नियोजित भेट शक्य झाली नाही, अशी माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली.
यानंतर संशोधक विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्र्यांना देण्यासाठी तयार केलेले निवेदन पोलिसांकडे सुपूर्द केले. हे निवेदन मुख्यमंत्री कार्यालयापर्यंत पोहोचवावे, अशी विनंतीही विद्यार्थ्यांनी केली.
सरसकट पीएच.डी. फेलोशिपची प्रमुख मागणी
सारथी, बार्टी, महाज्योती, टार्टी, आर्टी, वनार्टी आणि अमृत या संस्थांच्या माध्यमातून पीएच.डी. नोंदणी केलेल्या पात्र विद्यार्थ्यांना सरसकट संशोधन अधिछात्रवृत्ती देण्यात यावी, अशी आंदोलनकर्त्यांची प्रमुख मागणी आहे.
याशिवाय पीएच.डी. फेलोशिपच्या रकमेतून घरभाडे भत्ता (HRA) आणि आनुषंगिक निधी (Contingency Grant) कपात करू नये, अशी मागणीही करण्यात आली आहे.
संशोधन अधिछात्रवृत्तीसाठी अर्ज करताना लागू असलेली ३५ वर्षांची वयोमर्यादा शिथिल करावी, तसेच २०२६ मध्ये पीएच.डी. नोंदणी झालेल्या संशोधक विद्यार्थ्यांनाही अधिछात्रवृत्तीच्या प्रक्रियेत सहभागी करून घ्यावे, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.
मंत्री संजय शिरसाट यांच्याशी चर्चा
आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर संशोधक विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाने सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे मंत्री संजय शिरसाट यांची भेट घेतली. यावेळी विद्यार्थ्यांनी त्यांच्या विविध मागण्या मंत्री शिरसाट यांच्यासमोर मांडल्या.
विद्यार्थ्यांच्या माहितीनुसार, संशोधक विद्यार्थ्यांच्या मागण्यांचा विषय आगामी मंत्रिमंडळ बैठकीत मांडला जाईल, असे आश्वासन मंत्री संजय शिरसाट यांनी दिले. तसेच बार्टीच्या २०२३ मधील विद्यार्थ्यांसाठी शासनाने निर्णय घेतला असून, संशोधक विद्यार्थ्यांचाही प्रश्न सोडविण्यासाठी कार्यवाही केली जाईल, असे सांगण्यात आल्याचे विद्यार्थ्यांनी नमूद केले.
उद्धव ठाकरे, राधाकृष्ण विखे पाटील आणि अब्दुल सत्तार यांना निवेदन
आंदोलनकर्त्या संशोधक विद्यार्थ्यांनी शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन दिले. याशिवाय माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेऊन पीएच.डी. संशोधक विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यात आली.
आमदार अब्दुल सत्तार यांनाही विद्यार्थ्यांनी निवेदन देत त्यांच्या मागण्या शासनस्तरावर मांडून प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याची विनंती केली.
विविध विद्यार्थी संघटनांचा आंदोलनाला पाठिंबा
या आंदोलनाला एसएफआय, एआयएसएफ, महिला काँग्रेस, सम्यक विद्यार्थी आंदोलन, पॅन्थर परिवर्तन चळवळ, नागरी मूलभूत हक्क अभियान आणि सत्यशोधक विद्यार्थी संघटना, महाराष्ट्र यांच्यासह विविध विद्यार्थी व सामाजिक संघटनांनी पाठिंबा दिला आहे.
या संघटनांचे प्रतिनिधी आंदोलनस्थळी उपस्थित राहून संशोधक विद्यार्थ्यांच्या मागण्यांना समर्थन देत आहेत.
मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवणार
समाजकल्याण कार्यालयासमोर सुरू असलेल्या बेमुदत धरणे आंदोलनाचा नववा दिवस पूर्ण झाला आहे. शासनाने संशोधक विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर तातडीने निर्णय घ्यावा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाला भेटीसाठी वेळ द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
शासनाकडून ठोस निर्णय होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार संशोधक विद्यार्थ्यांनी व्यक्त केला आहे. मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही आंदोलनकर्त्यांनी दिला आहे.
आंदोलनस्थळी अरुण मते, मनिषा बल्लाळ, भारत पवार, कृष्णा घाडगे, गीता मगर, मोहन मुंडे, हरीकेश मोरे, अभिषेक गायकवाड, मंगेश घाटूळ, श्वेता वराडे, आरती दांगोडे, मिरा सावंत, प्रदीप चव्हाण, रवी राठोड, श्रीकांत पातोळे यांच्यासह मोठ्या संख्येने संशोधक विद्यार्थी उपस्थित होते.