चंद्रपूरच्या बेरोजगार युवकांसाठी Apprenticeshipच्या जागा वाढवा; शिवसेना कामगार संघटनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

चंद्रपूरच्या बेरोजगार युवकांसाठी Apprenticeshipच्या जागा वाढवा; शिवसेना कामगार संघटनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
चंद्रपूरच्या बेरोजगार युवकांसाठी Apprenticeshipच्या जागा वाढवा; शिवसेना कामगार संघटनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

चंद्रपूर, दि. २१ :- औद्योगिक आणि खाण क्षेत्रासाठी ओळखल्या जाणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर ITI, Diploma, Engineering तसेच पदवीधर युवक रोजगाराच्या प्रतीक्षेत आहेत. जिल्ह्यात WCL, MIDC आणि विविध मोठे उद्योग कार्यरत असतानाही स्थानिक युवकांना अपेक्षित प्रमाणात रोजगार व प्रशिक्षणाच्या संधी मिळत नसल्याचा आरोप शिवसेना भारतीय कामगार संघटनेने केला आहे.

केंद्र सरकारच्या NATS (National Apprenticeship Training Scheme) आणि NAPS (National Apprenticeship Promotion Scheme) या योजनांच्या माध्यमातून युवकांना उद्योगांमध्ये प्रत्यक्ष प्रशिक्षण घेण्यासोबत कौशल्यविकास आणि स्टायपेंडची संधी उपलब्ध होते. चंद्रपूर जिल्हा Board of Apprenticeship Training (Western Region), Mumbaiच्या कार्यक्षेत्रात येतो.

दरम्यान, 2026 मध्ये WCLमध्ये विविध ट्रेडसाठी Apprenticeship भरतीची प्रक्रिया सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर स्थानिक युवकांना या संधीचा अधिकाधिक लाभ मिळावा, या मागणीसाठी शिवसेना भारतीय कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष तथा चंद्रपूर तालुका प्रमुख संतोष लिलाबाई दशरथ पारखी यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.

निवेदनातून करण्यात आलेल्या प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे :

WCLच्या चंद्रपूर, बल्लारपूर, वणी, वणी उत्तर आणि माजरी एरियामध्ये स्थानिक युवकांसाठी Apprenticeshipच्या जागा वाढवाव्यात.

MIDCमधील सर्व कंपन्यांची बैठक घेऊन NATS/NAPS अंतर्गत उपलब्ध प्रशिक्षणाच्या जागांचा आढावा घ्यावा.

ITI, Diploma आणि Engineering विद्यार्थ्यांसाठी तालुकानिहाय मार्गदर्शन व नोंदणी शिबिरे आयोजित करावीत.

जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली WCL, जिल्हा उद्योग केंद्र, रोजगार विभाग आणि ITI संस्थांची संयुक्त बैठक घेऊन Apprenticeshipसाठी वार्षिक उद्दिष्ट निश्चित करावे.

स्थानिकांना प्राधान्य देण्याची मागणी

चंद्रपूरमध्ये कोळसा उत्खनन आणि औद्योगिक प्रकल्पांमुळे स्थानिक नागरिकांना विविध समस्या व आव्हानांना सामोरे जावे लागत असल्याचे सांगत, त्याच जिल्ह्यातील युवकांना रोजगार व कौशल्य प्रशिक्षणाच्या संधींमध्ये प्राधान्य मिळावे, अशी भूमिका संतोष पारखी यांनी मांडली.

“चंद्रपूरच्या भूमीतून कोळसा निघतो, प्रदूषणाचा त्रास स्थानिकांना सहन करावा लागतो; मात्र रोजगाराच्या संधींमध्ये स्थानिक युवकांना मागे ठेवले जात असेल तर ते योग्य नाही. WCL आणि MIDCने चंद्रपूरच्या भूमिपुत्रांना Apprenticeshipच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात,” अशी मागणी त्यांनी केली.

मागण्या तातडीने मार्गी न लागल्यास बेरोजगार युवकांना सोबत घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

या निवेदनाच्या प्रती कौशल्य विकास आयुक्त, नवी मुंबई, BOAT मुंबई, WCL महाव्यवस्थापक आणि जिल्हा उद्योग केंद्र यांच्याकडेही पाठविण्यात आल्या आहेत.

महाराष्ट्र वाणी | सत्यासाठी निर्भीड | जनतेसाठी समर्पित