पिकांची स्थिती पाहण्यासाठी जिल्हाधिकारी थेट शेतात; पर्जन्यमान व पीक परिस्थितीवर बारकाईने लक्ष
जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी खडकनारळा येथे केली प्रत्यक्ष पाहणी
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि. १५ :- जिल्ह्यात यंदा पर्जन्यमानाची स्थिती अद्याप समाधानकारक नसल्याने कृषी, महसूल, ग्रामविकास तसेच संबंधित सर्व यंत्रणांनी पर्जन्यमान आणि पिकांच्या परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवावे, असे निर्देश जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी दिले.
जिल्ह्यातील पीक परिस्थिती तसेच अनियमित पर्जन्यमानामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा जिल्हाधिकारी गौडा यांनी आज आढावा घेतला. आढावा बैठकीनंतर त्यांनी सकाळी गंगापूर तालुक्यातील खडकनारळा येथे जाऊन शेतात प्रत्यक्ष पिकांची पाहणी केली.
यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू पी.एम., निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते, मनपा उपायुक्त अंकुश पांढरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दीपक गवळी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
कापूस, मका आणि सोयाबीनवर कमी पावसाचा परिणाम
आढावा बैठकीत देण्यात आलेल्या माहितीनुसार, सप्टेंबर महिन्यापर्यंत जिल्ह्यात ४१७.३ मि.मी. पर्जन्यमान नोंदविण्यात आले आहे. सद्यस्थितीत कमी पर्जन्यमानाचा परिणाम कापूस, मका आणि सोयाबीन या प्रमुख पिकांवर झाल्याचे दिसून येत आहे.
पिकांच्या परिस्थितीचा नियमित आढावा घेऊन आवश्यक ती माहिती प्रशासनाला तातडीने उपलब्ध करून द्यावी, अशा सूचनाही संबंधित यंत्रणांना देण्यात आल्या.
चारा उपलब्ध; १० मार्च २०२७ पर्यंत पुरेल
जिल्ह्यात पशुधनासाठी सध्या पुरेसा चारा उपलब्ध असून, उपलब्ध साठा १० मार्च २०२७ पर्यंत पुरेल, अशी माहिती बैठकीत देण्यात आली.
मध्यम व लघु प्रकल्पांतील जलसाठ्याचा आढावा
जिल्ह्यातील १६ मध्यम प्रकल्पांमध्ये २९.९५ टक्के, तर ९९ लघु प्रकल्पांमध्ये ३४.८८ टक्के जलसाठा उपलब्ध आहे. जिल्ह्यातील सर्वात मोठ्या जायकवाडी प्रकल्पात ८६.७९ टक्के जलसाठा उपलब्ध असल्याची माहिती प्रशासनाने दिली.
यंत्रणांनी दक्ष राहण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
यंदाच्या पर्जन्यमानाची स्थिती लक्षात घेता पिकांच्या परिस्थितीवर विशेष लक्ष ठेवणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांच्या पिकांवर पावसाच्या अनियमिततेचा काय परिणाम होत आहे, याचे सातत्याने निरीक्षण करावे आणि संबंधित यंत्रणांनी दक्ष राहावे, असे निर्देश जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी दिले.
महाराष्ट्र वाणी | सत्यासाठी निर्भीड | जनतेसाठी समर्पित