KFC च्या किचनमधील अस्वच्छता उघड! FDA ची मोठी कारवाई; शहानूरवाडीतील आउटलेटचा अन्न परवाना निलंबित
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि १४ :- प्रसिद्ध फास्ट फूड ब्रँड KFC च्या शहानूरवाडी येथील आउटलेटमध्ये अन्न व औषध प्रशासनाच्या (FDA) तपासणीत अस्वच्छतेसह अन्न हाताळणीतील गंभीर त्रुटी आढळून आल्याची माहिती समोर आली आहे. बीड बायपास परिसरातील या उपाहारगृहातील परिस्थितीची दखल घेत प्रशासनाने संबंधित आस्थापनेचा अन्न परवाना निलंबित केला आहे.
तपासणीदरम्यान स्वयंपाकघरातील स्वच्छतेबाबत अनेक त्रुटी निदर्शनास आल्या. ओव्हनमधील ग्रिल आणि बेकिंग ट्रेवर मोठ्या प्रमाणात काळी घाण साचलेली होती. चिकन तयार करण्यासाठी वापरला जाणारा ओटाही अस्वच्छ अवस्थेत आढळला.
याशिवाय, कच्चे व शिजवलेले मांस तसेच शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थ हाताळताना आवश्यक ती स्वतंत्र व्यवस्था आणि विलगीकरण राखले जात नसल्याचे तपासणीत आढळले. बेसिनजवळ कचरा पडलेला होता, तर कोल्ड स्टोरेज परिसरात पाणी साचल्याचेही निदर्शनास आले. तेलकट सॉसच्या बाटल्यांमुळे स्वच्छतेच्या व्यवस्थेवरही प्रश्न उपस्थित झाले.
ग्राहकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
खाद्यपदार्थ तयार करताना स्वच्छता राखणे, कच्चे व शिजवलेले पदार्थ स्वतंत्र ठेवणे आणि स्वयंपाकघरातील उपकरणांची नियमित साफसफाई करणे आवश्यक असते. तपासणीत आढळलेल्या त्रुटींमुळे अन्नसुरक्षेबाबत चिंता निर्माण झाली आहे. ग्राहकांच्या आरोग्याला संभाव्य धोका लक्षात घेऊन FDA ने संबंधित आस्थापनेचा अन्न परवाना निलंबित करण्याची कारवाई केली.
या घटनेमुळे बाहेरचे खाद्यपदार्थ आवडीने खाणाऱ्या ग्राहकांनी अन्नाची गुणवत्ता आणि स्वच्छतेबाबत अधिक जागरूक राहण्याची गरज अधोरेखित झाली आहे.
महाराष्ट्र वाणी | सत्यासाठी निर्भीड, जनतेसाठी समर्पित