जाळीचा देव–सावळदबारा सिन्हा घाट रस्त्यासाठी पाठपुरावा; इद्रिस मुलतानींची सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांकडे मागणी
रस्ता मंजूर झाल्यास लाखो भाविकांचा 20 किमी प्रवास वाचणार; 12 गावांच्या विकासाला मिळणार चालना
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि १७ :- श्रीक्षेत्र जाळीचा देव–सावळदबारा सिन्हा घाट रस्त्याच्या मंजुरीसाठी भाजप अल्पसंख्याक महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष इद्रिस मुलतानी यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री मा. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची मंत्रालयात भेट घेऊन निवेदन सादर केले.
श्री चक्रधर स्वामींची पवित्र स्थळे असलेल्या जाळीचा देव आणि सावळदबारा यांना जोडणारा हा मार्ग विकसित झाल्यास लाखो भाविकांचा तसेच नागरिकांचा सुमारे 20 किलोमीटरचा अतिरिक्त प्रवास वाचणार आहे. याशिवाय परिसरातील 12 गावांतील नागरिकांना दळणवळण, शिक्षण, आरोग्य आणि व्यापाराच्या दृष्टीने मोठा लाभ मिळणार असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
या रस्त्याचे महत्त्व केवळ धार्मिक पर्यटनापुरते मर्यादित नसून खानदेश, मराठवाडा आणि विदर्भ या तीन विभागांना जोडणारा महत्त्वाचा संपर्क मार्ग म्हणूनही तो विकसित होऊ शकतो. विशेष म्हणजे सन 1972 मध्ये रोजगार हमी योजनेअंतर्गत या रस्त्याचे मोठ्या प्रमाणात काम पूर्ण झाले होते. मात्र, अधिकृत मान्यता न मिळाल्याने पुढील विकासकामे रखडली आहेत.
मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी या मागणीची सकारात्मक दखल घेत संबंधित विभागाकडून आवश्यक माहिती मागवून तात्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. तसेच रस्त्याच्या प्रस्तावाची तांत्रिक तपासणी करून योग्य निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.
हा मार्ग मंजूर झाल्यास भाविक, शेतकरी, व्यापारी, विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळेल तसेच संपूर्ण परिसराच्या विकासाला नवी गती मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
वाचत रहा ‘महाराष्ट्र वाणी’ — आपल्या परिसरातील विकासाच्या प्रत्येक घडामोडींची विश्वासार्ह माहिती!