एस.टी. कॉलनीत पुन्हा ड्रेनेजचा उद्रेक: मनसेचा इशारा – काम सुरू करा, अन्यथा तीव्र आंदोलन
बातमी महाराष्ट्र वाणी.com
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि ३ जून :– शहरातील एस.टी. कॉलनी, प्रबोधनकार ठाकरे नगर (वार्ड क्रमांक ८१) येथे गेल्या अनेक महिन्यांपासून ड्रेनेज लाईन चोकअप होत असून नागरिकांना घाण पाण्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यावर साचलेले पाणी व दुर्गंधीमुळे आरोग्य धोक्यात आले आहे. याविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) थेट इशारा देत प्रशासनाच्या हलगर्जीपणावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
स्थानिक रहिवासी व मनसे पदाधिकाऱ्यांनी आज झोन क्रमांक ६ सिडको येथील वार्ड कार्यालयात धडक दिली. वार्ड अधिकारी गिराम साहेब अनुपस्थित असल्याने वार्ड अभियंता चौधरी साहेब यांनी शिष्टमंडळाकडून निवेदन स्वीकारले. सदर निवेदनात, ड्रेनेज लाईन अत्यंत जुनी असून ती वारंवार चोक होते. महिन्यातून २-४ वेळा जेटिंग मशीन लावून चेंबर्स स्वच्छ करण्यात येतात, तरीही कायमस्वरूपी तोडगा न निघाल्याने घाण पाणी मुख्य रस्त्यावर वाहत आहे.
या पाण्यामुळे मंदिर परिसरात चालणेही अशक्य झाले आहे, तसेच वाहनांच्या सांडणाऱ्या पाण्यामुळे नागरिकांची नाहक हेळसांड होत आहे. डेंग्यूसारख्या रोगांचा धोका वाढत असून लहान मुले व ज्येष्ठ नागरिक त्रस्त आहेत.
मनसेच्या जिल्हा संघटक अशोक पवार पाटील, ॲड. विनोद भाले, उपजिल्हा संघटक अशोक कराळे पाटील, तसेच स्थानिक नागरिक आणि अन्य पदाधिकाऱ्यांच्या सह्यांनी युक्त निवेदनात प्रशासनावर ठोस कारवाईसाठी दबाव टाकण्यात आला.
विशेष म्हणजे, संपूर्ण एस.टी. कॉलनीच्या नवीन ड्रेनेज लाईनसाठी कामाला महिन्यांपूर्वीच मंजुरी मिळालेली असून टेंडर प्रक्रिया देखील पूर्ण झाली आहे. मात्र, अद्याप काम सुरू झालेले नाही. या ढिसाळ कारभारावर मनसेने प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून, आता तात्काळ काम सुरू न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
वार्ड अभियंता चौधरी साहेब यांनी संबंधित एजन्सीला पत्र देऊन काम सुरू करण्याचे आदेश दिल्याचे लेखी दिले असून, ३-४ दिवसांत काम सुरू होईल असे आश्वासन शिष्टमंडळाला देण्यात आले आहे.
गेल्या दोन वर्षांपासून रहिवासी हेच प्रश्न घेऊन प्रशासनाचे उंबरठे झिजवत आहेत. मंजुरी मिळूनही काम सुरू न होणे म्हणजे प्रशासन किती गंभीर आहे, याचे जिवंत उदाहरण ठरत आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क:
अशोक पवार पाटील – जिल्हा संघटक, महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्ते, साधन-सुविधा व आस्थापना, छत्रपती संभाजीनगर
– 9970929563