दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर आदित्य ठाकरे; २६-२७ सप्टेंबरला मराठवाडा-सोलापूर दौरा
छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यासह सोलापूर परिसरातील दुष्काळसदृश परिस्थितीचा प्रत्यक्ष आढावा घेण्यासाठी शिवसेना नेते तथा युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे २६ आणि २७ सप्टेंबर २०२६ रोजी दोन दिवसीय पाहणी दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात ते विविध गावांमध्ये जाऊन शेतकऱ्यांशी थेट संवाद साधणार असून, खरीप पिकांची स्थिती, पावसाची परिस्थिती आणि शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेणार आहेत.
पावसातील अनिश्चितता आणि त्याचा खरीप हंगामातील पिकांवर झालेला परिणाम यामुळे अनेक भागांतील शेतकरी अडचणीत असल्याचे सांगितले जात आहे. या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी केली जाणार आहे.
२६ सप्टेंबरचा दौरा
सकाळी १०.३० – बोरामणी, ता. सोलापूर
सकाळी ११.०५ – खानापूर, ता. तुळजापूर, जि. धाराशिव
दुपारी १२.०० – आष्टा मोड, ता. लोहारा, जि. धाराशिव
दुपारी १.४५ – तावशी ताड, ता. औसा, जि. लातूर
सायंकाळी ४.०० – गऊळ, ता. कंधार, जि. नांदेड
सायंकाळी ६.२० – माळवाटा शिवार, ता. वसमत, जि. हिंगोली
२७ सप्टेंबरचा दौरा
सकाळी १०.३० – टाकळी कुंभकर्ण, ता. परभणी
दुपारी १२.१० – वरफळ, ता. परतूर, जि. जालना
दुपारी १.३० – रामनगर साखर कारखाना, ता. जालना
सायंकाळी ४.०० – भगतवाडी, ता. गंगापूर, जि. छत्रपती संभाजीनगर
शेतकऱ्यांशी साधणार थेट संवाद
दौऱ्यात आदित्य ठाकरे शेतकऱ्यांकडून पिकांची सद्यस्थिती, पावसाअभावी निर्माण झालेल्या अडचणी आणि शासनाकडून अपेक्षित मदतीबाबत माहिती घेणार आहेत. प्रत्यक्ष शेतशिवारात जाऊन परिस्थिती समजून घेतल्यानंतर शेतकऱ्यांच्या समस्या आणि मागण्या शासनाच्या निदर्शनास आणून देण्याचा उद्देश असल्याचे सांगण्यात आले आहे.
दरम्यान, संबंधित गावांतील शेतकरी, ग्रामस्थ, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या अडचणी मांडाव्यात, असे आवाहन शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आले आहे.
महाराष्ट्र वाणी | सत्यासाठी निर्भीड | जनतेसाठी समर्पित