13 वर्षीय अल्पवयीनवरील अत्याचार प्रकरणात जलद तपासाची मागणी; शिवसेना भारतीय कामगार संघटनेचे पोलीस अधीक्षकांना निवेदन
आरोपीला पॉक्सो कायद्यानुसार कठोर शिक्षा, पीडितेला वैद्यकीय मदत व कुटुंबाला संरक्षण देण्याची मागणी
महाराष्ट्र वाणी
चंद्रपूर (प्रतिनिधी) दि १४ :- चंद्रपूर जिल्ह्यातील उर्जानगर (कोंडी वॉर्ड क्र. ५) येथे १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवरील कथित लैंगिक अत्याचाराच्या गंभीर प्रकरणात जलदगतीने तपास पूर्ण करून आरोपीवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शिवसेना भारतीय कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष तथा शिवसेना तालुका प्रमुख संतोष दशरथ पारखी यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनानुसार, १० जुलै २०२६ रोजी घडलेल्या या प्रकरणात ५२ वर्षीय आरोपीने शिक्षणाच्या बहाण्याने अल्पवयीन नातेवाईक मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. मुलीला पोटदुखीचा त्रास झाल्यानंतर जिल्हा रुग्णालयात तपासणी केली असता ती दोन महिन्यांची गर्भवती असल्याचे समोर आले. या प्रकरणी दुर्गापूर पोलीस ठाण्यात पॉक्सो कायद्यासह विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.
पोलीसांनी केलेल्या तातडीच्या कारवाईचे स्वागत करत संतोष पारखी यांनी या प्रकरणाचा तपास जलदगतीने पूर्ण करून दोषारोपपत्र तातडीने न्यायालयात दाखल करण्याची मागणी केली आहे. तसेच हा खटला फास्टट्रॅक न्यायालयात चालवून आरोपीला पॉक्सो कायद्यानुसार कमाल शिक्षा देण्यात यावी, असेही त्यांनी नमूद केले.
याशिवाय पीडित मुलीला मोफत वैद्यकीय उपचार, समुपदेशन, शासकीय योजनांचा लाभ, पीडित कुटुंबाला पोलीस संरक्षण आणि उर्जानगर परिसरात बालसुरक्षेबाबत जनजागृती मोहीम राबविण्याची मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे.
सदर गंभीर प्रकरणात प्रशासनाने संवेदनशीलतेने आणि तातडीने कारवाई करून पीडितेला न्याय मिळवून द्यावा, अशी अपेक्षा निवेदनातून व्यक्त करण्यात आली आहे.