५ दशकांचा सातबारा प्रश्न अखेर सुटला; इद्रिस मुलतानींच्या सततच्या पाठपुराव्याला यश, शेतकऱ्यांकडून साखरतुला

५ दशकांचा सातबारा प्रश्न अखेर सुटला; इद्रिस मुलतानींच्या सततच्या पाठपुराव्याला यश, शेतकऱ्यांकडून साखरतुला
५ दशकांचा सातबारा प्रश्न अखेर सुटला; इद्रिस मुलतानींच्या सततच्या पाठपुराव्याला यश, शेतकऱ्यांकडून साखरतुला

महाराष्ट्र वाणी

सोयगाव/ सावळदबारा दि १५ :- सावळदबारा परिसरातील गायरानधारक शेतकऱ्यांचा गेल्या सुमारे पाच दशकांपासून प्रलंबित असलेला सातबारा (७/१२ उतारा) मिळण्याचा प्रश्न अखेर मार्गी लागल्याने सुमारे ४०० शेतकरी कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला आहे.

हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मुस्लिम समाज अभ्यास समितीचे अध्यक्ष तथा राज्यमंत्री दर्जा इद्रिस मुलतानी यांनी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या महत्त्वाच्या प्रश्नाला अखेर यश मिळाल्याने शेतकरी बांधवांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या पार्श्वभूमीवर सावळदबारा येथे ग्रामस्थ आणि शेतकरी बांधवांच्या वतीने इद्रिस मुलतानी यांचा साखरतुला करून सत्कार करण्यात आला. यावेळी लाल फेटा परिधान करून शिवाजी महाराज चौकातून गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहात त्यांचे स्वागत करत शुभेच्छा दिल्या.

“शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर दिसणारे समाधान हीच माझ्या प्रयत्नांची खरी पावती आहे,” अशी भावना इद्रिस मुलतानी यांनी व्यक्त केली. भविष्यातही शेतकरी तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या विविध प्रश्नांसाठी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करत राहण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

पाच दशकांपासून रखडलेला सातबारा प्रश्न मार्गी लागल्याने सावळदबारा परिसरातील शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीच्या हक्काच्या दृष्टीने महत्त्वाचा दिलासा मिळाला आहे.

“शेतकऱ्यांचा प्रश्न, माझी जबाबदारी!” या भूमिकेतून पुढील काळातही शेतकरीहितासाठी काम करत राहण्याचे इद्रिस मुलतानी यांनी सांगितले.