१२ तारखेपर्यंत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईकडे कूच करणार; मनोज जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
महाराष्ट्र वाणी
अंतरवाली सराटी दि २९ :- मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. सरकारने १२ तारखेपर्यंत मराठा समाजाच्या मागण्यांवर ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी करत निर्णय न झाल्यास मुंबईकडे कूच करण्याची घोषणा त्यांनी केली.
जरांगे पाटील म्हणाले की, आजपासून सुरू केलेले आमरण उपोषण १२ तारखेपर्यंत सुरूच राहणार आहे. या कालावधीत सरकारने मागण्या मान्य केल्या नाहीत, तर १२ तारखेला मुंबईकडे जाण्याची तयारी करण्यात येईल. मागण्या मान्य होईपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.
“सरकारकडे अजून १५ दिवसांचा वेळ आहे. या काळात निर्णय घ्या; अन्यथा १२ तारखेला मुंबईकडे निघायचे,” असा स्पष्ट इशारा जरांगे पाटील यांनी दिला.
आगामी आंदोलनासाठी मराठा समाजाने मोठ्या संख्येने तयार राहावे, असे आवाहन त्यांनी केले. महिलांनी मुंबईला येऊ नये, तसेच ज्येष्ठ नागरिकांनी सुरुवातीच्या टप्प्यात मुंबईकडे निघू नये, असेही त्यांनी स्पष्ट केले. मुंबईतील मराठा बांधवांनी आंदोलनासाठी येणाऱ्या समाजबांधवांच्या जेवणाची व्यवस्था करावी आणि आवश्यक मार्गदर्शन करावे, असे आवाहन त्यांनी केले.
आंदोलन १२ टप्प्यांत राबविण्याची घोषणा करत आता निर्णायक आणि आरपारची लढाई लढण्याची वेळ आली असल्याचे जरांगे पाटील यांनी सांगितले. त्यामुळे १२ तारखेला पुढील आंदोलनाची दिशा काय असेल, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.